- राकेश कदम
सोलापूर - गाजाेद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने आयाेजित केलेला पुस्तक प्रकाशन कार्यक्रम उधळण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारतीय जनता युवा माेर्चाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी समविचार सभेने केली.
समविचार सभेचे समन्वयक रविंद्र माेकाशी, समीउल्लाह शेख, यशवंत फडतरे, विष्णू गायकवाड, हासीब नदाफ, युसूफ शेख मेजर, मेहबूब काेथिंबीरे यांनी शुक्रवारी दुपारी पाेलिस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त विजय कबाडे यांना निवेदन दिले. मेहबूक काेथिंबीरे म्हणाले, गाजाेद्दीन रिसर्च सेंटरने शहरातील धार्मिक तेढ व जातील व्देष संपविण्याच्या उद्देशाने आजवर काम केले. या संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचे चरित्र उर्दूमध्ये भाषांतरीत करुन घेतले. या संस्थेच्या माध्यमातून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहात टिपू सुलतान पत्रसार संग्रह, आरएसएस भाजप विचारधारा आणि राजनैतिक अजेंडा या दाेन पुस्तकांचे प्रकाशन आयाेजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर, ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी यांचे व्याख्यान हाेणार आहे. पुस्तक प्रकाशन आणि व्याख्यान उधळण्याची धमकी भाजयुमाेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. भारतीय संविधानाने दिलेलया अभिव्यक्ती स्वातंत्र्यास अनुसरून काेणाच्याही धार्मिक भावना न दुखावता व काेणतेही धार्मिक व्देष न पसरविता हा कार्यक्रम हाेणार आहे. तरीही भाजयुमाेचे कार्यकर्ते कार्यक्रम उधळण्याची धमकी देत आहेत. सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
आमच्या कार्यक्रमाचे रेकाॅर्डिंग कराआमच्या कार्यक्रमात काेणाच्याही भावना दुखावण्याचे काम हाेणार नाही. पाेलिसांनी हवे तर आमच्या कार्यक्रमाचे रेकाॅर्डिंग करावे अशी मागणी काेथिंबीरे यांनी केली.