आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. आमदार भालके यांच्यानंतर या मतदारसंघाचा वारसदार कोण अशी आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. भालके यांच्या लोकप्रियतेवरून सहानुभूतीच्या लाटेच्या फायदा घेण्यासाठी त्यांची पत्नी किंवा मुलाचे नाव पुढे येत आहे. भालके यांच्या वारसदाराची घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच करतील असे यापूर्वीच सांगण्यात आले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भालके यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले समाधान आवताडे आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. मंगळवारी त्यांनी मंगळवेढा,पंढरपूर, अकलूज, मोहोळ व सोलापुरातील जिल्हा परिषद सदस्यांच्या भेटी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या मतदारसंघात परिचारक गटाबरोबर मोहिते-पाटील यांच्या गटाचेही वर्चस्व आहे. त्यामुळे या दोन्ही गटाचा पाठिंबा मिळाला तर आपले स्थान बळकट होईल या आशेने आवताडे यांनी या गटातील नेत्यांशी संपर्क केला आहे.
परिचारक गटाकडे लक्ष
परिचारक गट काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादीकडून संधी नसल्याने समाधान आवताडे यांनी नशीब आजमाविण्यासाठी पुन्हा भाजपच्या नेत्यांशी संपर्क केल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार प्रशांत परिचारक याबाबत काय भूमिका घेतात यावर आवताडे यांचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.
फडणवीस घेणार बैठक
या मतदारसंघात कोणाला उभे करायचे याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ४ डिसेंबर रोजी मुंबईत निवडक स्थानिक नेत्यांची बैठक बोलाविल्याचे सांगण्यात आले. आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांच्यात चर्चा होऊन नाव फायनल होणार आहे.