सोलापूर : भाजपच्या ‘बुथ चलो अभियान’साठी मतदारांच्या भेटीला आलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना विजेच्या कृत्रिम टंचाईला तोंड देणाºया शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे बुधवारी तातडीची बैठक घेऊन विजेचा प्रश्न सोडवा, असे फर्मान सहकारमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना सोडले.
येत्या ६ एप्रिल रोजी मुंबईत बीकेसी मैदानावर भाजपाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या लोकाभिमुख योजना, विकासकामांची माहिती देण्यासाठी ‘बुथ चलो अभियान’चे आयोजन करण्यात आले आहे. थेट बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी हा संपर्क दौरा आहे. आज एका दिवसात तब्बल १० गावांना भेटी देऊन सहकारमंत्र्यांनी मतदारांशीही संवाद साधला. उत्तर सोलापूर तालुक्यातून सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान सहकारमंत्र्यांचा ताफा कंदलगावात दाखल झाला. ग्रामस्थांनी कॅनॉलचे पाणी सोडण्याची जोरदार मागणी केली. तेथूनच मंत्र्यांनी जलसंपदा अधिकाºयांशी संपर्क साधून उजनीचे पाणी तातडीने सोडण्याचे आदेश सोडले. दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान कॅनॉलला पाणी सोडण्यात आले. मंत्र्यांचा दौरा भीमा नदीकाठच्या ‘त्या’ चार गावात येताच शेतकºयांचा आक्रोश सुरू झाला. लवंगी, कारकल, औज (म), कुरघोट या चार गावात सध्या अवघा दोन तास वीजपुरवठा केला जातो. हा वीजपुरवठा चार तास करण्याच्या मागणीसाठी शेतकºयांनी मंत्र्यांसमोर संतप्त भावना मांडल्या. तीच स्थिती चिंचपूरमध्ये काही प्रमाणात दिसून आली. या दौºयात प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या सेक्रेटरी स्वाती जाधव, प्रदेश सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य सहकारी बँकेचे संचालक अविनाश महागावकर, तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, पं. स. सदस्य एम. डी. कमळे, शशिकांत दुपारगुडे, जि. प. सदस्य प्रभावती पाटील, प्रशांत कडते, भीमाशंकर नरसगोंडे, गुरण्णा तेली, मंद्रुपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ, महिला तालुकाध्यक्ष सुशीला ख्यमगोंडे, डॉ. चनगोंडा हविनाळे आदी सहभागी झाले होते.जिल्हा प्रशासनाची आज बैठक- भीमा नदीकाठच्या शेतकºयांच्या वीजपुरवठ्यासाठी संतप्त भावना जाणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला. उद्या बुधवारी चार तास वीजपुरवठा करण्याच्या मागणीवर चर्चा करून तातडीने निर्णय घेण्यासाठी जलसंपदा, महावितरण, सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक घेण्याचे आदेश दिले.