बार्शी : येथील बँक ऑफ इंडिया, ढगे मळा शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी व आमदार रणजितसिंह बबनराव शिंदे यानी संगनमत करून पांडुरंग मधुकर थोरबोले (रा. काळेगाव, ता.बार्शी) या शेतकऱ्याच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून डमी व्यक्ती उभी करून दोन लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी न्या. आर.एस. धडके यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
याबाबत फसवणूक झालेले शेतकरी पांडुरंग मधुकर थोरबोले हे रायगड जिल्ह्यात महात्मा गांधी विद्यालय येथे शिक्षक म्हणून नोकरी करीत आहेत. त्यांनी बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज तुर्कपिंप्री या साखर कारखान्याचे सभासद होताना आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति दिल्या होत्या.
ते नोकरी करत असताना २०१६ मध्ये बँक ऑफ इंडिया, पानगाव शाखेला जमीन तारण ठेवून कर्ज काढले होते. त्यावेळी सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स दिल्या होत्या. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, शाखा ढगे मळा, बार्शी शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी व रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी संगनमतांनी त्यांनी कर्ज मागणीचा अर्ज दिल्याचे दाखवून खोटी कागदपत्रे बनवून पांडुरंग थोरबोले म्हणून डमी व्यक्तीस उभे केले. शिवाय बनावट खाते उघडून दोन लाखांचे कर्ज मंजूर करून दिले गेले.
त्यानंतर बँकेने ५ सप्टेंबर २०१९ रोजी दोन लाख ५६ हजार १८७ रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठविल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत शहर पोलिसांत याबाबत तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. पांडुरंग थोरबोले यांनी बार्शी न्यायालयात ॲड. आर.यू.वैद्य, ॲड. के. पी. राऊत यांच्या माध्यमातून खासगी फौजदारी तक्रार दाखल केली. त्यावर व्यवस्थापक रणजितसिंह शिंदे व एक त्रयस्थ व्यक्ती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले.