सोलापूर : झेडपीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ यांनी जिल्हा नियोजन सभेत ठराव होऊनही अंमलबजावणीत कुचराई केल्याने जिल्हाधिकाºयानी दोघांची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिले.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी व्यासपीठावर सहपालकमंत्री तानाजी सावंत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महापालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रास्ताविकात सभेपुढे पाच विषय असल्याचे सांगितले. ३१ मार्चअखेर जिल्हा नियोजनकडे ३३९ कोटी ७७ लाख निधी आला व त्यापैकी ३३९ कोटी २४ लाख निधी खर्ची पडल्याचे स्पष्ट केले. ९९.९८ टक्के खर्च झाला असून, राज्यात सोलापूर प्रथम क्रमांकावर असल्याचे नमूद केले. केवळ दुग्ध विकासासाठी आलेले ४ लाख तांत्रिक कारणास्तव खर्च होऊ शकले नाहीत. खर्चाबाबत समाधान व्यक्त करून आमदार गणपतराव देशमुख यांनी ३० टक्के निधी केव्हा प्राप्त झाला, असा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर जानेवारीच्या सभेत सांगोला तालुक्यात शिक्षकांची ६८ पदे रिक्त असल्याचे निदर्शनाला आणल्यावर प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी आठ दिवसात पदे भरली जातील, असे सांगितले होते. पण या प्रश्नाला दिलेले उत्तर विसंगत असल्याचे निदर्शनाला आणले. यावर सुभाष माने यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील गोंधळ निदर्शनाला आणून दिला.
प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी उपस्थित प्रश्नाचे उत्तर द्यायचे सोडून आतापर्यंत रिक्त जागा भरण्यासाठी काय केले हे सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे आमदार भारत भालके व इतर सदस्यांनी गोंधळ सुरू केला. यावर सहपालकमंत्री तानाजी सावंत संतापले. २० मिनिटे नुसता रिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. रिक्त जागा सर्व तालुक्यात समान आहेत काय, असा त्यांनी सवाल केला. या प्रश्नालाही शिक्षणाधिकाºयांनी व्यवस्थित उत्तर न दिल्याने सावंत यांनी कारवाई करा, म्हणून आग्रह धरला. त्यावर पालकमंत्री देशमुख यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाºयांची चौकशी करून कारवाईबाबत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाºयांना सूचित केले.
सन २०१८ मध्ये मंगळवेढा व माळशिरस तालुक्यात दगावलेल्या जनावरांच्या नुकसान भरपाईबाबत शासनाकडे अहवाल पाठविला काय, या प्रश्नाला उत्तर देताना पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर दैवज्ञ यांनी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. जनावरे दगावली किती व प्रस्ताव पाठविला किती जनावरांचा, अधिकारी सभागृहाला चुकीची माहिती देत आहेत, असा आक्षेप आमदार भालके, अरुण तोडकर, शैला गोडसे यांनी घेतला. त्यावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पशुवैद्यकीय अधिकारी दैवज्ञ यांची चौकशी करावी व कामचुकारपणा केला असेल तर कारवाईचा अहवाल पाठवावा, अशी सूचना केली.
पिण्याचे पाणी ठेकेदाराला- लेंडवे चिंचाळे येथील पाणीपुरवठा योजनेतून महामार्गाच्या कामाला चार इंची कनेक्शन देऊन दुष्काळात पाणी दिल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्रीकांत देशमुख यांनी केली. त्यावर प्राधिकरणाचे अभियंता पुरुषोत्तम भांडेकर यांनी कनेक्शन रितसर दिल्याचे सांगितले. त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर जुलैमध्ये करार झाल्याचे आमदार भालके यांनी निदर्शनाला आणले. मेथवडे येथेही अशाच प्रकारे बेकायदा कनेक्शन दिल्याचा सदस्यांनी आरोप केला. त्यावर जिल्हाधिकारी भोसले यांनी सदस्यांच्या तक्रारीवरून कनेक्शन बंद केल्याचे स्पष्ट केले.