मरवडे येथील सार्वजनिक आडोसा शौचालयाच्या मातीच्या भरावावर सुरू असलेले बेकायदेशीर घरकूल बांधकाम एक महिन्याच्या मुदतीत काढून टाकण्याची लेखी हमी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी ७ जुलै रोजी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत मरवडे ग्रामस्थांना दिली होती.
मात्र त्याच दिवशी संबंधित लाभार्थ्यांने विटा व अन्य बांधकाम साहित्याचा त्या परिसरात साठा करून बेकायदेशीरपणे ८ व ९ जुलै रोजी सार्वजनिक जागेत बांधकाम केलेले आहे. सदरचे संपूर्ण बांधकाम साहित्य तत्काळ हटवून हे काम त्वरित थांबविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी मरवडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान ६ सदस्यांनी व ग्रामस्थांनी ८ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली होती.
सदरच्या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामसेवकावर प्रशासकीय कारवाईची मागणीही माजी उपसरपंच विजय पवार यांनी निवेदनाद्वारे केली होती.
-----
अहवाल सादर करण्याच्या सूचना
या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी ९ जुलै रोजी मरवडे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना नोटीस बजावली असून सदरचे बांधकाम सुरू असताना केलेले दुर्लक्ष हा कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी बाब असून नियमाप्रमाणे चोवीस तासांत सदरचे बांधकाम काढून घेण्याची कार्यवाही करावी व तसा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.