सोलापूर: ग्रामीण भागातील दहा तालुक्यांत खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ५ हजार ६३३ बिलांची तपासणी करण्यात आल्यावर संबंधित हॉस्पिटलनी ३५ लाख ५१ हजारांचे जादा बिल आकारल्याचे लेखा परीक्षणातून उघड झाले आहे. संबंधित हॉस्पिटलनी जादा आकारलेले बिल रुग्णांना परत करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांना हैराण केले. कोरोना उपचारासाठी ९२ हॉस्पिटलमध्ये सोय करण्यात आली. यात जवळपास ७० हॉस्पिटल खासगी आहेत. कोरोनाची लागण झालेल्या अनेकांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याने खासगी हॉस्पिटलचा रस्ता धरला, तर काही जणांनी चांगली सुविधा मिळते म्हणून स्वत:हून खासगी रुग्णालयात उपचार घेतले. गरिबांना मात्र खासगी रुग्णालयात उपचार घेणे महागात पडले आहे. अनेकांनी नाइलाजाने दागिने मोडून, सावकाराकडून कर्ज घेऊन दवाखान्याचे बिल भरल्याचे दिसून आले आहे. कोविड सेंटर चालविणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनाकडून मात्र रुग्णांना कोणतीच दया दाखवली नसल्याचे दिसून येत आहे. याउलट अनेकांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल उकळल्याचे दिसून आले आहे. कोरोनाकाळात खासगी कोविड हॉस्पिटलकडून रुग्णांची पिळवणूक होऊन नये म्हणून जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तहसीलमार्फत प्रत्येक तालुक्यास लेखा परीक्षकांची नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा परीक्षक अजय पवार यांच्याकडून तालुक्यातील खासगी रुग्णालयांच्या बिलाच्या तपासणीबाबत आढावा घेतला जात आहे.
२३ मेपर्यंत दहा तालुक्यांतील लेखा परीक्षकांनी ५ हजार ६३३ बिलांची तपासणी केली आहे. यामध्ये दवाखान्यांनी ३५ लाख १४ हजार २७३ रुपये जादा बिल लावल्याचे आढळून आले आहे. ज्या रुग्णालयांनी हे जादा बिल वसूल केले आहे, त्यांनी संबंधित रुग्णांना हे बिल परत करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. लेखा परीक्षकांच्या तपासणीमुळे दवाखान्याची लबाडी समोर आली आहे. काेरोनाकाळात कोविड सेवा देणाऱ्या हॉस्पिटलनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे बिल आकारणी करणे अपेक्षित आहे, असे असताना अनेकांनी रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिल आकारून सेवेत पाप केल्याचे समोर आले आहे.
अक्कलकोट तालुक्यात शून्य
जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी अक्कलकोट तालुक्यात एकही खासगी कोविड हॉस्पिटल कार्यरत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या तालुक्यातील शून्य बिलाची तपासणी झाली. बार्शी तालुक्यात संसर्ग जास्त आहे व या ठिकाणी खासगी दवाखानेही जास्त आहेत. बार्शीत १ हजार ८२८ बिलांची तपासणी होऊन १९ लाख १२ हजार परत करण्याचे आदेश झाले आहेत. माळशिरसमध्ये १ हजार २६ बिलांची तपासणी होऊन ३ लाख ६१ हजार, पंढरपूरमध्ये ७०२ बिलांची तपासणी होऊन ९ लाख ६० हजार रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बिलाबाबत काय आहे नियम
खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी बिल आकारण्यास सरकारने तीन टप्पे केले आहेत. जनरल वॉर्ड: ४ हजार, ऑक्सिजन: ७ हजार ५००, व्हेंटिलेटर: ९ हजार, त्याचबरोबर जनरल वाॅर्ड पीपीई किटसाठी ६०० रुपये, ऑक्सिजन वॉर्ड: १ हजार, आयसीयू: १२०० रुपये. असे असताना जनरलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन लावल्याचे दाखवून तसेच पीपीई किटचा जादा चार्ज लावल्याचे दिसून आल्याचे पंढरपूरचे लेखा परीक्षक सदावर्ते यांनी सांगितले.