सोलापूर - शहरातील प्रमुख चौकांमध्ये लागलेले तेरा बेकायदेशीर होर्डिंग 24 तासाच्या आत हटवण्यात यावे. अन्यथा महापालिका हे होर्डिंग काढून साहित्य जप्त करेल. इमारत मालकांवर दंडात्मक कारवाई होईल, असा इशारा मनपा उपायुक्त आशिष लोकरे यांनी सोमवारी दिला.
मुंबईत होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला. सोलापूर शहरात पडझड झालेल्या इमारतींवर होर्डिंग लावण्यात आल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला होता. महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी या वृत्ताची दखल घेऊन इमारत मालकांना नोटीस बजावली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सरस्वती चौक, सम्राट चौक, टिळक चौक अशा विविध ठिकाणी बेकायदेशीर आणि धोकादायक स्थितीतील होर्डिंग आढळून आली आहेत. सोमवारी सकाळपासून या इमारत मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या. मंगळवारी सकाळपर्यंत होर्डिंग न हटवल्यास महापालिका कारवाई करेल. होर्डिंग चे साहित्य जप्त तर होईल. परंतु, इमारत मालकांवर अतिक्रमणाची दंडात्मक कारवाई होणार आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने झोन अधिकाऱ्यांनाही शहरातील होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदेशीर आणि धोकादायक स्थितीतील होर्डिंग हटवण्याची कार्यवाही या आठवड्यात पूर्ण होईल असा विश्वासही लोकरे यांनी व्यक्त केला.