हरिदास रणदिवे । अरण : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शेटफळ येथे कार्यरत असणारा आयुर्वेदिक दवाखाना अरण येथे स्थलांतर करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी २६ नोव्हेंबरला काढला. हा दवाखाना तत्काळ अरणला स्थलांतरित करून सेवा चालू करण्याचे आदेश संबंधितांना दिले. या आदेशाला एक महिना उलटून गेला. शेटफळचा दवाखाना तातडीने बंद झाला, मात्र अरणला तो स्थलांतरित झालाच नाही. त्यामुळे ‘गेला दवाखाना कुणीकडे?’ असे विचारण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.
आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्य डी. एन. लाड यांच्याशी या संदर्भात संपर्क साधून विचारणा के ली असता, आपण सध्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत असल्याचे आणि पाटकूलला प्रतिनियुक्तीवर असल्याचे सांगितले. अरणला प्रशस्त इमारत, वीज, मुबलक पाणी या सर्व सुविधा मिळाल्यावर येऊ, असे त्यांनी सांगितले. सध्या अरणला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत उपलब्ध आहे. सध्या तरी या इमातरतीमध्ये हा दवाखाना चालू करता येणे अडचणीचे नाही. नागरिकांचेही हेच मत आहे.
झेडपी सदस्य भारत शिंदे यांनी या रुग्णालयासाठी पालकमंत्री व अध्यक्षांकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला कागदोपत्री यश आले असले तरी दवाखाना मात्र अद्याप पोहोचलाच नसल्याने तो दुसरीकडे स्थानांतरित तर होणार नाही ना, याची नागरिकांना शंका सतावत असल्याचे बोलले जात असल्याचे सांगण्यात आले़
पाचपैकी चार सुरू...- सोलापूर जिल्हा परिषदेचे एकूण पाच आयुर्वेदिक दवाखाने चालू आहेत. जिंती, शेळवे, गाडेगाव व श्रीपतपिंपरी या चार ठिकाणी सध्या ते कार्यरत आहेत. अरणला जाणार म्हणून शेटफळचा बंद झाला. मात्र अरणलाही पोहोचला नसल्याने सध्या चारच रुग्णालये सुरू आहेत.