सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी मतदार यादीत समाविष्ट केलेली २७४ नावे वगळण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक कार्यालयाने घेतला आहे. यासंदर्भात शासनाने ३ मे रोजी अध्यादेश काढला होता. परंतु, त्याचा लाभ सोलापूरऐवजी बार्शी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील व्यापाºयांना झाला आहे.
सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणी घेतली जात आहे. सोलापूर बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघातून दोन प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. या मतदारसंघातील एकूण ११६४ मतदारांची यादी बाजार समितीने जाहीर केली होती. बार्शी बाजार समितीसाठी ३८२ मतदारांची यादी जाहीर केली होती.
यादरम्यान शासनाने नवा अध्यादेश जारी केला. बाजार समितीच्या क्षेत्रात व्यापारी व अडते म्हणून काम करण्यासाठी ज्यांनी अनुज्ञप्ती (लायसन्स) धारण करून एक महिन्याहून कमी नसेल इतका कालावधी झाला असेल आणि ज्यांनी अशा क्षेत्रात दहा रुपये इतक्या रकमेचा व्यवहार केला असेल, अशा व्यापाºयांचा मतदार यादीत समावेश करावा, असा आदेश काढला. या आदेशाच्या आधारे सोलापूर बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघाच्या यादीत २७४ व्यापारी मतदारांचा समावेश व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, जिल्हा निवडणूक कार्यालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
राजकीय हेतू असफल- सोलापूर बाजार समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्याचे सहकार व पणन खाते नवे आदेश जारी करीत असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. सोलापूर बाजार समितीच्या व्यापारी मतदार यादीत काही नावे घुसविण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेते करीत होते. या पार्श्वभूमीवर शासनाने एक महिन्यापूर्वी लायसन्स धारण केलेल्या व्यापाºयांचा व्यापारी मतदार यादीत समावेश करण्याचा आदेश जारी केला होता. परंतु, त्याचा लाभ सोलापूर कार्यक्षेत्रातील व्यापाºयांना झालेला नाही. सहकार व पणन खात्याचा राजकीय हेतूही असफल झाला आहे. बार्शी बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघात ३८२ व्यापारी मतदारांचा समावेश आहे. शासनाने जारी केलेल्या अध्यादेशाचा लाभ बार्शीतील व्यापारी मतदारांना होणार आहे.
फेटाळण्याचे कारण?- जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबर २०१७ ही अखेरची तारीख निश्चित करून सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. २७४ जणांनी यानंतरच्या कालावधीत परवाने घेतलेले आहेत. शासनाने जारी केलेला अध्यादेश लागू होत नसल्याने ही मागणी फेटाळण्यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
१५ मेपर्यंत जाहीर होईल अंतिम यादी- सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सहकार निवडणूक प्राधिकरणाने उच्च न्यायालयात सादर केला आहे. त्यानुसार १५ मे रोजी सोलापूर आणि बार्शी बाजार समितीची अंतिम मतदार यादी जाहीर होईल, असे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र यादरम्यान काही लोक न्यायालयात गेल्यास पुन्हा निवडणूक लांबण्याची चिन्हे आहेत.