- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : बालसंगोपन योजनेंतर्गत अनाथ, निराधार, बेघर, शारीरिक व्यंग किवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी मासिक अनुदान दिले जाते. आधी ते १११५ रुपये होते. मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयानुसार ते आता २२५० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे आता बालसंगोपन योजनेतील प्रत्येकाच्या खात्यात नव्या निर्णयानुसार पैसे जमा होणार आहेत. या शासनाच्या निर्णयामुळे बेघर, निराधारांना दिलासा मिळाला आहे.
बाल संगोपन योजनेची सुरुवात २००५ साली करण्यात आली. या योजनेंतर्गत अनाथ,निराधार,बेघर व शारीरिक व्यंग किवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी मासिक अनुदान दिले जाते. जेणेकरून अशा मुलांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. एखाद्या बालकाचे आई वडील एखाद्या कारणामुळे मृत्युमुखी पडतात वा इतर कारणामुळे एखादे बालक अनाथ झाल्यामुळे त्याला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते जसे शिक्षण,आरोग्य व इतर समस्या अशा परिस्थितीत अशा बालकांना या योजनेंतर्गत त्यांना १८ वर्षांपर्यंत पालन, पोषण, शिक्षण प्रदान करणे हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.
पूर्वी शासनाकडून बालसंगोपन योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला १११५ रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात येत होते. त्यात वाढ करण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता प्रत्येक महिन्याला योजनेतील लाभार्थ्यांना २२५० रुपये मिळणार आहेत. याबाबतचा निर्णय झाला असून त्याबाबतचे पत्र जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयास प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले.
बालसंगोपन योजनेंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. कोरोनानंतर या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. नव्या शासन निर्णयानुसार आता प्रत्येक महिन्याला २२५० रुपये एवढे अनुदान मिळणार आहे. शासनाचे आदेश येताच अनुदानाच्या रकमेत नक्कीच वाढ हाेईल.- विजय खोमणे(जिल्हा महिला व बालविकास अधिकारी)