सोलापूर : शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयांनी कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन व इतर औषधे उपलब्ध करून द्यावीत. रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे घेऊन येण्यास सांगू नये. रेमिडेसिविर संदर्भात काही अडचणी असल्यास अन्न व औषध नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.
रेमडेसिविर औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवणे आणि पुरवठादार यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती गठित केली आहे. या आदेशात रविवारी दुरुस्ती करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद उपजिल्हाधिकारी हेमंत निकम यांच्याकडे होते. आता हे अध्यक्षपद निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्याकडे देण्यात आले आहे.
दरम्यान, सर्व रुग्णालयांनी गरजेनुसार आणि प्रोटोकॉलनुसार रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करावा. इंजेक्शनची मागणी करताना रुग्णालयामधील रुग्णसंख्या विचारात घेऊन व ज्या रुग्णांना खरोखरच रेमडेसिविरची आवश्यकता आहे अशी संख्या विचारात घेऊन तीन दिवस पुरेल एवढ्या इंजेक्शनची मागणी नोंदवावी. कोविड रुग्णालयाशी संलग्न नसलेल्या किरकोळ औषध विक्रेत्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करू नये. कोविड रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लक्ष ठेवणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.