उन्हाळ्यासाठी उजनी धरणातून ६ हजार क्युसेक पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. हे पाणी चंद्रभागा नदीपात्रात पोहचले आहे. यामुळे पुढील काही दिवस नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांना पुरेसे पाणी मिळणार आहे. पुढील काही दिवस नदीकाठच्या शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. त्याचबरोबर पंढरपूर व सांगोला शहराला व इतर योजनांना पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या पंढरपुरातील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा (१०६ एमसीएफटी) पूर्णक्षमतेने भरला आहे. आता पुढील दीड महिनापर्यंत पंढरपूर व सांगोला शहराला पिण्याचे पाणी पुरणार आहे.
त्याचबरोबर गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील विष्णुपद मंदिराजवळील बंधाऱ्यात देखील पाणी अडवण्यात आले आहे. यामुळे चंद्रभागा नदीच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासह अन्य मंदिरांना पाण्याचा वेढा आल्याचे दिसत आहे.
----
फोटो : चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना उजनीतून सोडण्यात आलेल्या पाण्याचा वेढा पडल्याचे दिसत आहे. (छाया : सचिन कांबळे)