आप्पासाहेब पाटील
सोलापूर ; कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी दिवस रात्र बंदोबस्ताचे काम करणाऱ्या पोलिसांना दिवाळी बोनस मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दिवाळी काळात मात्र ॲडव्हान्स म्हणून थोडी रक्कम पोलिसांना दिली जाते, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना तीही मिळत नसल्याची माहिती लोकमतशी बोलताना एका निवृत्त पोलीस पोलीस अधिकाऱ्याने सांगितली.
सोलापूर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यात पोलीस बांधव दिवस-रात्र एक करतात. पोलिसांच्या अविरत सुरक्षा सेवेमुळे सर्व नागरिक सणासुदीच्या दिवसांत सुटी घेऊन कुटुंबीय तसेच मित्रमंडळींसह आनंदाचे क्षण अनुभवतात. पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल, हे एक समाज म्हणून विसरुनच गेलोय. गेल्या अनेक वर्षांपासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी. पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी, अशी मागणी अमित ठाकरे यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
------------
जिल्ह्यात २६ पोलीस ठाणे...
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत २६ पोलीस ठाणे व अन्य पोलीस स्टेशन व दूरक्षेत्र पोलीस केंद्र कार्यरत आहेत. सोलापूर तालुका, मंद्रुप, वळसंग पोलीस ठाणे शहराच्या आसपास आहेत. तर बार्शी, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा आदी तालुका पातळीवर स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यरत आहेत.
----------
साडेतीन हजार पोलिसांचा ताफा
सोलापूर ग्रामीण पोलीस दलात साडेतीन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यात पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यासह पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशा विविध पदांवर पोलीस कार्यरत आहेत.
-----------
अमित ठाकरे यांचे फडणवीसांना पत्र...
राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राज्यातील पोलीस बांधवांना दिवाळी बोनस जाहीर करावा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
----------
यांनाच मिळतोय १२ हजार ५०० रुपयांचा ॲडव्हान्स
पोलिसांना दिवाळीत बोनस दिला जात नाही. फक्त १२ हजार ५०० रूपये ॲडव्हान्स दिला जातो. तोही पोलीस नाईक, पोलीस शिपाई, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांनाच मिळतो. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोनस किंवा ॲडव्हान्स मिळत नसल्याची माहिती देण्यात आली.