सोलापूर : महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त सोरेगाव येथील निवारा केंद्रात असलेल्या ३९ परप्रांतीयांना सिद्धेश्वर हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी पुरीभाजीचे जेवण दिले. या आदरतिथ्याने भारावलेल्या परप्रांतीयांनी जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या.
'कोरोना'च्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सोलापुरात संचारबंदीचा कडक अंमल सुरू झाला. यामुळे सीमाबंदी केल्यावर अडकलेले मध्यप्रदेशातील २२, उत्तर प्रदेशातील ३ आणि कर्नाटकातील १४ कामगारांना सोरेगाव येथील एसआरपी कॅम्पमध्ये महापालिकेने निवारा उपलब्ध करून दिला. गेले एक महिना महसूल, महापालिकेच्या यंत्रणेमार्फत या कामगारांना एकवेळ नाष्ट, दोनवेळ जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी अनेक संस्थांनी मदतीचा हात दिला आहे.
शुक्रवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिद्धेश्वर हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी या कामगारांना पुरीभाजी, शीरा, मसाला भाताचे जेवण दिले. आज ही मेजवानी का असा सवाल या कामागाारांनी उपस्थित केला. त्यावेळी देवीदास चेळेकर यांनी आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन असल्याचे त्यांना सांगितले. राज्याच्या स्थापनादिनानिमित्त कामगारांचे केलेले हे आदरतिथ्य पाहून सर्वजण भारावले. महापालिकेचे अधिकारी श्रीकांत खानापूरे, मल्लू इंडे, मल्लू जाधव यांनी लवकरच सर्वांना गावाकडे सोडण्यासाठी प्रशासन तयारी करीत असल्याचे सांगितले. यावर अमित रजाक ( रा.दमखनजोगा, जि. मोराना) हे भावनिक झाले व त्यांनी सोलापूरकरांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बंगळुरू येथे ते फ्लोरिंगचे काम करीत होते. लॉकडाऊन जाहीर केल्यावर सोलापूरमार्गे गावाकडे परतत असताना मार्केट यार्डाजवळ पोलिसांनी पकडले. गेली एक महिना सोलापूरकरांनी या सर्व परप्रांतीयांची व्यवस्था केली, हे आम्ही या जन्मात विसरू शकणार नाही, जय महाराष्ट्र अशा शब्दात त्यांनी आपली भावना प्रकट केली.