सोलापूर : महावितरण कंपनीकडून सध्या थकीत वीज बिलाची वसुली करण्यात येत आहे. शिवाय विनापरवाना, अवैधरीत्या विजेची चोरी करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू आहे. दरम्यान, ‘लाइनमनला हात लावाल तर कायद्याचा झटका बसेल,’ असा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतदेखील वीजग्राहकांच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, कर्मचारी सध्या गंभीर अर्थिक संकटामुळे थकबाकीदारांकडून वीजबिलांची वसुली व नाइलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत आहेत. मात्र वर्षानुवर्षे वीज बिल थकविणाऱ्या ग्राहकांकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ तसेच कार्यालयात जाऊन तोडफोड करण्याचे प्रकार सुरू आहेत.
------------
...तर होईल फौजदारी गुन्हा दाखल
शासकीय कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा कार्यालयाची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांमध्ये शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अभियंता व कर्मचाऱ्यांना आपले शासकीय कर्तव्य बजावता यावे यासाठी शिवीगाळ व मारहाणीच्या प्रकरणांमध्ये व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तत्काळ कारवाई करण्यासाठी महावितरणकडून सातत्याने पाठपुरावा केला जातो.
-------------
मागील आठ महिन्यांतील महत्त्वाच्या घटना
- - जानेवारी महिन्यात तळेहिप्परगा येथे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती.
- - दसुर (ता. माळशिरस) येथे थकबाकी वसुलीला गेलेल्या पथकाला मारहाण झाल्याची घटना घडली हाेती.
- - करकंब (ता. पंढरपूर) येथे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती.
- - बठाण (ता. मंगळवेढा) येथे काही लोकांनी महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.
- - कोळे (ता. सांगोला) येथेही वसुलीसाठी गेलेल्या लोकांना मारहाण करण्यात आली होती. त्यात अधिकारी जखमी झाले होते.
--------
...तर होतो सेवेवर परिणाम
वीज ही सर्वांसाठी अत्यावश्यक व मूलभूत गरज आहे. मात्र, मारहाणीचा अनुचित प्रकार घडलेल्या एखाद्या परिसरात वीजपुरवठा विस्कळीत झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या ग्राहकसेवेवर कदाचित परिणाम होण्याची शक्यता असते.
----------
बिलांचा वेळेत भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी थकबाकीदारांकडे जाऊन वीज बिलांची थकीत रक्कम भरण्याची विनंती करीत आहेत. तरीही काही ग्राहक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येते. वीज बिल भरा अन् महावितरणला सहकार्य करा.
- ओंकार गाये, अध्यक्ष, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियन, सोलापूर
---------
महावितरण केवळ सरकारी कंपनी असल्याने वीज ही मोफत असल्याच्या गैरसमजातून अनेक थकबाकीदार वर्षानुवर्षे वीज बिल भरीत नसल्याचे दिसून येत आहे. वीज बिलांचा भरणा वेळेत केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना येण्याची गरजच लागणार नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे.
- विजयकुमार राखले, वीज कर्मचारी संघटना, सोलापूर
---------