"पावसामुळे अनेक गोष्टींवर मर्यादा आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा पूरपरिस्थितीच्या नियंत्रणासाठी वापरावी लागत आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करून निवडणुका पावसाळ्यात घेणं सोयीचं होणार नाही हे त्यांच्याशी बोलणार आहोत," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.
ओबीसी आरक्षणाबाबत मी आणि उपमुख्यमंत्री राज्याचे अॅटर्नी जनरल यांची भेट घेतली. आरक्षण त्यांना मिळेल आणि न्याय मिळेल असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही लोकशाही मार्गानं राज्य स्थापन केलं आहे. देशात घटना, कायदा आहे. त्याच्या बाहेर कोणालाही जाता येत नाही. लोकशाहीत बहुमताला, नंबर्सला महत्त्व आहे. हे सरकार जे स्थापन केलंय ते कायदेशीर आहे. आम्हाला न्यायव्यस्थेवर विश्वास असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
"माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला आषाढी एकादशीच्या पूजेचा मान मिळाला हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. माझे वडिल या ठिकाणी होते, माझा मुलगाही या ठिकाणी होता आणि नातूही, हे भाग्य सर्वांनाच मिळालं पाहिजं. पांडुरंगाला सर्वकाही माहित असतं. पाऊस उशिरा सुरू झालाय, पण चांगला सुरू झाला आहे. कुठेही अतिवृष्टी होऊ नये, बळीराजा सुखावला पाहिजे, चांगला पाऊस होऊ द्या, बळीराजा आपला मायबाप आहे. सर्व संकट दूर होऊ द्या, करोनाचा नायनाट होऊ द्या, सर्वांना चांगले दिवस येऊ द्या असं साकडं मी पांडुरंगाकडे घातलं आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्याची भरभराट होऊ द्या - मुख्यमंत्रीया राज्याची भरभराट विकास वेगानं होऊ द्या, सर्व समाज घटक या सर्वांसाठी सरकार प्रयत्नशील असेल. सर्वांगिण विकासाला आम्ही प्राधान्य देणार आहोत. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांनीदेखील आम्हाला सांगितलं, राज्याच्या विकासाठी मोठे प्रकल्प उभे करा. निधीची कमतराता भासू देणार नाही आणि केंद्र सरकार पाठिशी उभे राहिल असं आश्वासनही त्यांनी दिल्याचे ते म्हणाले.
लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मंदिराचा विकास झाला पाहिजे, यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना पंढरपुरातील विठ्ठल मंदिर व परिसरातील विकासाचा एक विशेष आराखडा तयार करण्याचे आदेश दिले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.