रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : कोरोना व्हायरसच्या भीतीने एकीकडे सर्वच घटक सतर्क झाले असताना दुसरीकडे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीनेही सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. दररोज हजारो तर सोमवारी त्यात कैकपटीने भाविक दर्शनासाठी येत असतात. हा धागा पकडून भाविकांच्या आरोग्याला कुठे बाधा येऊ नये यासाठी मंदिर परिसर दररोज दोनवेळा स्वच्छ पाण्याने धुण्याचा निर्णय पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी घेतला आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा... कोरोना व्हायरसपासून बचाव करा या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आवाहनाचे पालन आता प्रत्येक घटक काटेकोरपणे करताना दिसत आहे. त्यात श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी मागे कशी राहील. आज ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची महिमा सातासमुद्रापार पोहोचलेली आहे.
महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील दररोज अनेक भाविक श्री सिद्धरामांच्या दर्शनासाठी येत असतात. दर्शन म्हणजे गर्दी आलीच. त्यामुळे पंच कमिटीने गेल्या पाच-सहा दिवसांपासूनच एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मंदिर परिसरात दिवसातून दोन-तीन वेळा स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मंदिर परिसरातील योग समाधी, गाभारा, सभा मंडप, दासोह (अन्नछत्र) आदी ठिकाणचा परिसर दिवसातून दोनदा पाण्याने धुऊन काढला जात आहे. परिसरात फिनेल आणि डीडीटी पावडर फवारण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. पंच कमिटीच्या सर्वच सदस्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंच कमिटीमधील कर्मचारी, सुरक्षारक्षकही एक सामाजिक बांधिलकीतून भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न भेडसावू नये यासाठी बारीक-सारीक घटनांवर लक्ष ठेवून आहेत.
सोमवारचा दिवस अधिक सतर्कतेचा
- ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा वार सोमवार समजला जातो. सोमवारी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मंदिरात गर्दी असते. या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने कोरोना व्हायरसची भीती संपेपर्यंत येणाºया प्रत्येक सोमवारी अधिक सतर्क राहण्याचा निर्धार केला आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने गेल्या चार-पाच दिवसांपासून मंदिरात दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या संख्येतही थोडी घट झाल्याचे सांगण्यात आले. दर्शनाला येताना भाविकांनी मास्क सोबत घेऊन यावे असे आवाहनही पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली पाहणी- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहरवासीयांसह सर्वच विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. गर्दी होणाºया कार्यक्रमांना त्यांनी बंदी घातली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी निकम आदींनी शनिवारी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिराची पाहणी केली. पंच कमिटीने पाच-सहा दिवसांपासूनच खबरदारी घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह सदस्यांचे कौतुकही केले. नंतर पंच कमिटीच्या सदस्यांसमवेत बैठक घेऊन योग्य त्या सूचना केली. यावेळी पंच कमिटीचे सदस्य भीमाशंकर पटणे, विश्वनाथ लब्बा, बाळासाहेब भोगडे यांच्यासह सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंच कमिटीने पाच-सहा दिवसआधीच खबरदारी घेतली आहे. कमिटीचे सदस्य, अधिकारी, कर्मचाºयांना जागरुक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुठे काहीही घडले तरी सोलापूरवर कधीच संकट आले नाही, ही सिद्धरामांचीच महिमाच आहे. कोरोना व्हायरसपासून सोलापूर शहर, जिल्ह्यातील नागरिकांना कसलाच धोका होणार नाही, असे मी श्री सिद्धरामांना साकडे घालतो.-धर्मराज काडादी,अध्यक्ष- सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी.