डोंगरगाव येथील वैभव भुसे व संतोष भुसे या दोन भावंडांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. वडील उत्तम भुसे शेती करतात. वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती आहे. अवघ्या २१व्या वयात दोन्ही भावंडांनी परिस्थितीला हातभार लावण्यासाठी व्यवसाय करण्याचे ठरविले. मंगळवेढा येथील मार्केट कमिटीत २०१६ साली एक गाळा घेऊन केवळ ४० हजारांच्या भांडवलावर गुरुकृपा मशिनरी नावाने व्यवसाय सुरू केला.
सुरुवातीला केवळ सबमर्सिबल पंप, कडबाकुट्टी आदींची विक्री सुरू केली. शेतकऱ्यांसह इतर ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा देत दोन्ही भावंडांनी बाजारपेठेत आपली छाप निर्माण केली. त्यांचे व्यवसाय वाढीसाठी सुरू असलेले प्रयत्न व धडपड पाहून बँक ऑफ इंडियाचे आदित्यकुमार झा यांनी बँकेचे कर्ज उपलब्ध करून दिले. नाबार्डच्या माध्यमातून विवेक खिलारे यांनीही मोलाची मदत केली. त्यामुळे व्यवसायाला मोठा हातभार लागला.
अल्पावधीत व्यवसायात गरुडझेप
उपलब्ध पैशाची योग्य गुंतवणूक झाल्याने अल्पावधीतच त्यांनी व्यवसायात गरुडझेप घेतली. त्यानंतर शेतीविषयक सर्व विद्युतपंप, साहित्य, दूध काढणी यंत्र, कडबाकुट्टी मशीन, आटा चक्की, एसटीपी, सबमर्सिबल पंप विक्रीसाठी उपलब्ध ठेवले. तालुक्यात मिल्क मशीन व कडबा कुट्टी सर्वाधिक विक्रीचा बहुमान मिळविला आहे. वेगवेगळ्या कंपनीच्या एजन्सी घेतल्या आहेत. मंगळवेढा, सांगोला, जत तालुक्याच्या सीमा भागातील शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी घेरडी (ता. सांगोला) येथे व्यवसायाची दुसरी शाखा काढली. केवळ ४० हजारांच्या भांडवलावर सुरू केलेला व्यवसाय कोट्यवधी रुपयांच्या घरात गेला आहे. शेतकरी ग्राहकांचा मिळवलेला विश्वास हेच यशाचे गमक आहे, असे वैभव भुसे सांगतात.