सोलापूर - साखर कारखान्यांचा जिल्हा असलेल्या सोलापुरात, त्यातही माळशिरस तालुक्यासह इतर तालुक्यांत ऊसतोडणी हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या परिसरात ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर, बैलगाडीच्या साहाय्याने ऊस वाहतूक केली जाते. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या वाहतुकीने परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात वाढल्याचे दिसून येत आहे; परंतु सुरक्षितेच्या दृष्टीने वाहनांच्या पाठीमागे अथवा बाजूला कोणती उपाययोजना नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, माळशिरस तालुक्याच्या अन्य भागातील साखर कारखान्यांना विविध भागांतील शेतातून ऊस वाहतूक जोरात सुरू आहे. ऊस वाहतूक ट्रॅक्टर वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरलेला दिसतो.
ऊस वाहतूक करीत असताना ट्रॅक्टरच्या मागे एक किंवा दोन ट्रॉली असतात. ऊस वाहतूक करताना समोरून येणारी गाडी न दिसता फक्त ट्रॅक्टर दिसतो; परंतु ट्रॅक्टर ट्रॉलीला इंडिकेटर नसल्यामुळे अचानक फसगत होते. यामुळे अपघात होतात. कधी कधी अचानक बंद पडतो; मग तो ट्रॅक्टर रात्रभर रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला थांबवून ठेवला जातो. त्यामुळे बरेच अपघात घडतात. बेजबाबदारपणे ऊस वाहतूक करणारे डबल ट्रॉली ट्रॅक्टर मात्र रस्त्यावरून ये-जा करणारे दुचाकी वाहनधारक व पायी चालणाऱ्यांसाठी कर्दनकाळ बनले आहे.
नियमावलींची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक
ऊस वाहतूक करताना वाहतूकदार असून, उसाच्या वजनाचे हे वाढीव पैसे मिळत असतात. त्यामुळे ओव्हरलोड ऊस घेऊन जातात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व खराब रस्त्यामुळे दोन ट्रॉल्या नेताना ट्रॅक्टर चालकाला मोठी कसरत करावी लागते. नजीकच्या काळात अपघात होऊ नये, यासाठी आरटीओने ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांबाबत नियमावली तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगण्याची आवश्यकता आहे.
अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ऊस वाहतूक करणाऱ्यांवर नियमावली तयार करावी. त्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे आहे.
- सुनील शिंदे
वाहन चालक