सुजल पाटील
सोलापूर : कोरोना विषाणू आजाराची दहशत... संपूर्ण देशात लॉकडाउन... अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद... शहरासह ग्रामीण भागातील रस्ते सामसूम अन् निर्मनुष्य... एसटी बस, प्रवासी वाहतूक गाड्यांसह देशभरातील रेल्वे सेवा बंद... अशातच अचानक रेल्वे स्टेशन परिसरातून रेल्वेचा आवाज आला... रेल्वे सेवा बंद असताना मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात कोणती रेल्वे आली हे पाहण्यासाठी ‘लोकमत’ची टीम पोहोचली... अन् पाहतो तर काय माथाडी कामगार मालवाहतूक रेल्वे गाडीतील डब्यातून अन्नधान्य उतरवितानाचे दृष्य दिसले... याचवेळी येथील माथाडी कामगारांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, साहेब आपल्या देशातील कोणतीही व्यक्ती या संचारबंदी, कर्फ्यू काळात उपाशी राहणार नाही, या काळजीपोटीच आम्ही माल उतरविणे व चढविण्याचे काम करीत असल्याचे सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव, संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे़ गर्दीच होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशभरात संचारबंदी लागू केली आहे़ या संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत़ जीवनावश्यक वस्तूपासून कोणत्याही व्यक्तीची अडचण होऊ नये, यासाठी शासनाच्या वतीने योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे़ दरम्यान, लोकांची गरज भागविण्यासाठी व जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेने मालवाहतूक गाड्या सुरूच ठेवल्या आहेत़ त्यासाठी लागणारे मनुष्यबळही सज्ज ठेवले आहे़ एवढेच नव्हे, तर अखंडित वीजपुरवठा करणाºयांसाठी वीजनिर्मिती केंद्राला लागणारा कोळसाही आणला आहे.
सध्या रेल्वे प्रवासी वाहतुक बंद असल्याने सोलापूर विभागातील सर्वच रेल्वे स्थानकावर शुकशुकाट दिसत आहे़ प्रवाशांनी गजबलेले स्टेशन अचानक रिकामे रिकामे दिसत असल्याने अधिकाºयांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.
संचारबंदीमुळे रेल्वे प्रशासनाने मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याचेही सांगण्यात आले आहे़ संचारबंदी काळात प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन हिरडे यांनी केले आहे.
रेल्वे कर्मचाºयांची लावली १२ तासांची ड्यूटी... - जनता कर्फ्यूमुळे देशभरात रेल्वे प्रवासी सेवा बंद करण्यात आली आहे़ देशभर लॉकडाउनच्या काळात भारतीय रेल्वेच्या वतीने देशभरात मालगाडी चालविण्यात येत आहे़ लोकांच्या घरात अंधार पडू नये, अन्नधान्याचा तुटवडा भासू नये व आवश्यक सेवासुविधा मिळाव्यात, यासाठी रेल्वे अधिकारी, स्टेशन मास्टर, लोकोपायलट, साहाय्यक लोको पायलट, स्टेशन मास्तर, पॉइंट्स मॅन आपली सेवा देत आहेत़ या लोकांमुळे एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी माल पोहोचविणे शक्य होत आहे़ मध्य रेल्वे विभागात धावणाºया मालगाड्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या लागणाºया कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या कर्मचाºयांसाठी ड्यूटी रोस्टर बनविण्यात आले आहे़ ज्यानुसार सोलापूर मंडलात स्टेशन मास्तर आणि पॉइंट्स मॅन यांना १२-१२ तासांची ड्यूटी लावण्यात आली आहे़
तांदूळ अन् खत दाखल- अन्नधान्य, नाशवंत वस्तू, कोळसा इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी रेल्वे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोना विषाणू या साथीच्या आजारामुळे रेल्वेने १४ एप्रिलपर्यंत सर्व प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. सध्या रेल्वे देशभरात फक्त मालवाहतूक गाड्या चालवित आहे. या कालावधीत (२२ ते २५ मार्च) या सर्व जीवनावश्यक वस्तूंचे वजन अंदाजे ५.६६ लाख टन आहे. सोलापूर विभागातील कुर्डूवाडी व कलबुर्गी येथे प्रत्येकी एक रेक खत व तांदूळ उतरविण्यात आला.
मजुरांना गुड्स शेड ठिकाणी सोशल डिस्टन्सबद्दल माहिती देण्यात येत आहे. कामगारांना पुरेशा प्रमाणात मास्क आणि हात धुण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मालगाड्या वाहतुकीवर रेल्वे अधिकारी सर्व स्तरावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. या कठीण काळात रेल्वेला आपल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव आहे आणि सर्व भागधारकांना या प्रयत्नात संपूर्ण सहकार्य करण्याची विनंती केली जात आहे.- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर मंडल