सोलापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या राष्टÑवादी प्रवेशानंतर भाजपा पुरस्कृत महाआघाडीतून तिखट प्रतिक्रिया आल्या आहेत. संजय शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीचा शब्द देउन आले होते. परंतु, त्यांनी तो शब्द फिरविला. संजयमामा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना फोन करुन राष्ट्रवादीत जात असल्याचे सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी मात्र शिंदे यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला.
सोलापूर विधान परिषदेच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार प्रशांत परिचारक, झेडपी अध्यक्ष संजय शिंदे, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राउत, उत्तम जानकर, शहाजीबापू पाटील आदींची मोट बांधली होती. या नेत्यांच्या माध्यमातूनच भाजपाने माढा लोकसभेची तयारी केली होती.
माढ्यातील उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संजय शिंदे यांना दोनवेळा वर्षा बंगल्यावर बोलाविले होते. पण या बैठकीत शिंदे यांनी करमाळा विधानसभेच्या निवडणुकीत रस असल्याचे सांगितले. माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांना विचारणा केली होती. आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राउत यांना बोलावून घेतले होते. पण आता शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या निर्णयानंतर परिचारक आणि राउत यांची कोंडी झाली आहे. परिचारक आता कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष आहे.
सहकारमंत्री गटाला म्हणे साशंकता होतीच !- महाआघाडीच्या नेत्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना आपला नेता मानले आहे. पण सहकारमंत्री सुभाष देशमुख गटातील नेत्यांनी महाआघाडीतील नेत्यांवर वारंवार संशय व्यक्त केला होता. ही मंडळी सत्तेचा फायदा घेतील. ऐनवेळी राष्ट्रवादीत जातील, असे सहकारमंत्री गट वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगत होता. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी शुक्रवारी सकाळी संजय शिंदे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना फोन करुन राष्ट्रवादीत जाण्याबाबत कल्पना दिली.
संजय शिंदे यांना भाजपाने उमेदवारी देण्याची तयारी दाखविली होती. पण त्यांनी नकार दिला. आता ते राष्ट्रवादीत गेले आहेत. ते आमचे चांगले मित्र होते. आता तो त्यांचा निर्णय आहे. - विजयकुमार देशमुख, पालकमंत्री.
या असल्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा : पवार- भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले, भाजपामुळेच संजय शिंदे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. आता राष्ट्रवादीत जातानाही त्यांना भाजपचा उपयोग झाला. अध्यक्ष होताना त्यांनी भाजपाकडे सहकार्य मागितले. भाजपाने त्यांना विनाअट सहकार्य केले. परंतु, त्यांनी मैत्री निभावलेली नाही. साडेचार वर्षात सत्तेचा फायदा घेतला. मैत्रीची जबाबदारी निभावण्याची वेळ आल्यावर पाठीत खंजीर खुपसला. या अशा मित्रपेक्षापेक्षा आम्हाला उघडचा शत्रू चांगला वाटतो. आता राजकारणात हे नवीन नाही. या अशा गुणांमुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जनतेने नाकारले आहे. अशा स्वभावाच्या माणसांनी सर्वांना फसविलेले आहे. मुळातच शरद पवार यांनी फसवा फसवीचे राजकारण केले.