राकेश कदम सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनलला पराभूत करुन महाआघाडीने दणदणीत विजय मिळविला. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. माने यांनी अतिशय कठीण आणि अडचणीच्या काळात मुत्सद्दी निर्णय घेऊन, बेरजेचे राजकारण जुळवून आणले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही त्यांना जोरदार साथ दिली. दोन मालकांच्या डावपेचांनी अखेर बाजी मारली.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी न्यायालय आणि प्रशासकीय स्तरावरही लढाई झाली. दोन वर्षांपूर्वी बाजार समितीच्या संचालक मंडळात खदखद झाली. त्यातून आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे यांनी एकत्र येऊन बाजार समितीविरोधात तक्रारी केल्या. यादरम्यान, सहकार व पणन मंत्रिपद सुभाष देशमुख यांच्याकडे आले. दक्षिण विधानसभा मतदारसंघात दिलीप माने हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत. त्यांना रोखायचे असेल तर बाजार समितीत प्रवेश करण्याचा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांनीच सुभाष देशमुखांना दिला.
बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आला. दिलीप माने अडचणीत आले. फेर लेखापरीक्षण करुन घेण्यात आले. कारवाईचे संकेत मिळाले. यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बळीराम साठे यांच्यासोबत आघाडी न करण्याचा निर्णय महागात पडला. साठे आणि भाजपाची युती झाली. उत्तर सोलापूर तालुका पंचायत समिती हातातून गेली.
विरोधातील वातावरण आपल्या बाजूने वळविले- अडचणीची राजकीय परिस्थिती ओळखून माने यांनी उसवलेले सर्व धागे पुन्हा जोडण्यास सुरुवात केली. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी जुळवून घेतले. त्यामुळे शेळके आणि हसापुरे यांचाही नाइलाज झाला. दरम्यानच्या काळात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. या निवडणुकीतही शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश वानकर यांना कारखान्यात स्वीकृत संचालक म्हणून घ्यावे, यासाठी दिलीप माने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन बळीराम साठे यांना आपल्या बाजूने वळविले. दरम्यानच्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाले. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी काँग्रेसजनांची जुळवाजुळव सुरु केली. बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र या, असा सल्ला शिंदे यांनी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांना दिला. या एकोप्यातच माने यांनी अर्धी बाजी मारली. शहराच्या राजकारणात देशमुख विरुद्ध देशमुख वाद विकोपाला गेला. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी आधीच जुळवून घेतले होते.
सभापतीपदासाठी पालकमंत्र्यांचेही नाव- बाजार समितीच्या सभापतीपदासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी सभापती दिलीप माने, बाळासाहेब शेळके यांची नावे आघाडीवर आहेत. बाजार समितीच्या चाव्या पालकमंत्र्यांच्या हातात दिल्यास सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाने सुरु केलेले कारवायांचे राजकारण भाजपाचे लोक निपटून घेतील. त्यामुळे पालकमंत्र्यांचे नाव पुढे करण्याचा प्रयत्न महाआघाडीतील नेते करीत आहेत.
धनशक्तीमुळे जनशक्तीचा पराभवकृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला याचे समाधान आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रात मागील अनेक वर्षांची दहशत अजूनही कायम आहे आणि धनशक्तीमुळे जनशक्तीचा पराभव दिसत आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला. - सुभाष देशमुख, सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री