चपळगाव : गेल्या ८ वर्षांपासून हन्नूर (ता. अक्कलकोट) येथील केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली असलेल्या नियोजित सशस्त्र सीमा बल प्रशिक्षण केंद्राच्या निर्मितीचे काम रखडले आहे. भूमिपूजन झाल्यानंतर सदरची जागा सशस्त्र बलाच्या नावे हस्तांतरित झाली खरी. मात्र, वास्तवात याठिकाणी जनावरांचे कुरण बनले आहे. महाराष्ट्राला मिळालेली ही लाखमोलाची योजना पूर्ण व्हावी यासाठी तालुका व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
ही योजना हन्नूर परिसरातील ३० हेक्टर ९९ आर क्षेत्रावरील माळरानावर निर्माण होणार आहे. याठिकाणी भविष्यात हजारो युवकांसाठी प्रशिक्षण केंद्रासोबतच केंद्रीय विद्यालय, पोलीस मुख्यालय, शाळा, हाॅस्पिटलसोबतच इतर आस्थापनांची निर्मिती होणार आहे. या बाबी साकार झाल्यास परिसरातील शेतीपूरक व्यवसायासोबत व्यापार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ पाहायला मिळणार आहेत. यामुळे विकासाला चालना मिळेल. भविष्यात याठिकाणी नियोजित योजनेच्या माध्यमातून मोठी वसाहत निर्माण होऊ शकते. सोलापूरसह शेजारील जिल्ह्यांतील युवकांसाठी देशसेवेची संधी निर्माण होणार आहे, म्हणून रखडलेली ही योजना पूर्णत्वास येण्यासाठी अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी हन्नूरसह परिसरातील जनतेतून होत आहे.
.................
अनेक वेळा पाठपुरावा
या योजनेचे महत्त्व भविष्यासाठी लाखमोलाचे आहे. ही योजना पूर्णत्वास यावी यासाठी मी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. शिंदे यांनीही माझ्या समक्ष गृहमंत्रालय, तसेच संबंधित विभागास फोनद्वारे व पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. ही योजना सुरू व्हावी यासाठी अजूनही पाठपुरावा करणार आहे.
-सिद्धराम म्हेत्रे, माजी गृहराज्यमंत्री
..........
दिल्ली दरबारी पाठपुरावा
हन्नूर येथील केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या नियोजित सशस्त्र सीमा बल प्रशिक्षण केंद्राच्या निर्मितीचे काम पूर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा केला आहे. यापुढील काळात दिल्लीत जाऊन संबंधित कामाविषयी पाठपुरावा करणार आहे.
-सचिन कल्याणशेट्टी, आमदार
...................
ही योजना सुरू व्हावीच
ही योजना आम्हा युवकांसाठी दिशा देणारी आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून भरतीसाठी स्वतः प्रयत्न करीत आहे. देशसेवेची संधी शोधणाऱ्या युवकांना हे केंद्र मोलाचे आहे. ही योजना पूर्ण झाल्यास मोठा आधार मिळेल.
-आकाश बिराजदार, चपळगाव
260921\img20210922163412.jpg
हन्नुर ता.अक्कलकोट येथील केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या नियोजित सशस्त्र सीमा बल प्रशिक्षण केंद्राच्या माळरानावर जनावरे चरताना..