बार्शी : खरिपाच्या पेरणीनंतर उगवलेल्या पिकाच्या आंतरमशागतीस लागणारा बैल आजारी पडून औषधोपचाराअभावी मरण पावल्याची घटना बार्शी तालुक्यात पिंपरी सा. येथे घडली. केवळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे उपचार न मिळाल्याने बळीराजाला फटका बसला आहे.
तानाजी उद्धव काशीद या शेतकऱ्याचा हा बैल असून, पशुवैद्यकीय क्षेत्रातील पदविधारकांकडून याच क्षेत्रातील पदविधारकावर होत असलेला अन्याय दूर करण्याच्या मागणीसाठी शासकीय पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तसेच खासगी पशुवैद्यक १५ जुलैपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आजारी जनावरांना तातडीने उपचार मिळणे बंद झाले आहे. त्याचा फटका काशीद यांच्या खिलार बैलास बसला. वेळेवर उपचार न मिळाल्याने जागेवर तडफडून त्याचा मृत्यू झाला.
बैल आजारी पडताच तानाजी काशीद व त्यांच्या पत्नी बालिका काशीद यांनी तालुक्यातील अनेक डॉक्टरांशी संपर्क साधला. मात्र, संपामुळे कोणीच उपलब्ध झाले नाही. पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेल्या बैलाचा डोळ्यासमोरच तडफडून मृत्यू होत असल्याचे पाहून शेतकरी तानाजी काशीद व त्यांच्या पत्नी बालिका यांनी हंबरडा फोडला.
----
...तो पर्यंत बैलावर अंत्यसंस्कार करणार नाही : काशीद
ऐन मशागतीच्या वेळेस बैलाचा मृत्यू झाल्याने तानाजी काशीद यांचा जगण्याचा आधार तुटला आहे. पंचनामा होत नाही तोपर्यंत बैलाचा विधी करणार नाही, अशी भूमिका शेतकरी तानाजी काशीद यांनी घेतली आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामा करावा व आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
----
१८ बार्शी