अक्कलकोट : कोरोना नियमांचा भंग करून कारहुणवीनिमित्त बैलजोडी पळविल्याचा प्रकार नागणसूर येथे ४ जुलैला घडला. या घटनेत एका बैलाचा पाय तुटल्याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
ही घटना नागणसूर-व्हसूर मार्गे कर्नाटक राज्यात जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर घडली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदी आदेशाचे भंग करून नागणसूर येथे रविवारी सायंकाळी ४.३० वाजता आरोपी बसवराज प्रचंडे, भागणा प्रचंडे, चेतन प्रचंडे, कलय्या स्वामी, संगय्या स्वामी, राजकुमार नाटेकर, शिवानंद चादकोटे, गंगाधर भासगी, भीमाशंकर हाळतोट, रमेश तोळणुरे, सिद्धाराम धानशेट्टी, उमेश खिलारे, सदोजित थंब, अरविंद कोल्हापुरे, गड्याप्पा धरगोंडा (सर्व, रा. नागणसूर, ता. अक्कलकोट) यांनी लाकडी बंडी बैलांना जुंपून पळविले. यावेळी लाकडी बंडी एकमेकांना धडकून एका बैलाचे समोरचे दोन्ही पाय अडकले. तसेच उजवा पाय तुटला.
रविवारी मराठा आरक्षणबाबत मोर्चा असल्याने दुपारी बंदोबस्तासाठी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष दासरी, पोलीस नायक मियावाले, कॉन्स्टेबल थिटे उपस्थित होते. दरम्यान, त्यांना बैलाचा पाय तुटल्याची माहिती मिळाली. त्यावरून सोमवारी अजयसिंह शिंदे पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. अधिक तपास सुभाष दासरी हे करीत आहेत.
---
मोबाईलवरील डीपीने फोडले बिंग
बैलाला अघोरीरीत्या पळवून पाय तुटण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडल्याचे पाेलिसांना उशिरा समजले. ज्या बैलाचा पाय तुटला त्याचा स्टेटस काही मुलांनी मोबाईलला ठेवला. काही मुलांनी डीपी ठेवला आणि सारा प्रकार पुढे आला. काहींनी त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यावरून पोलिसांनी माहिती काढून १५ लोकांवर गुन्हा दाखल केला.