कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील अनेक गावांतून कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने त्यांना आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील सरकारी व खाजगी आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तपासणी मोहिमेत बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. आता बाधितांचा आकडा कमी होऊ लागला आहे. दरम्यान, रोपळे, लऊळ व कुर्डू या मोठ्या तीन गावांतील गावकऱ्यांनी एकत्र येत लोकसहभागातूनच ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारले.
रोपळे येथे ग्रामपंचायतच्या वतीने स्व. पांडुरंग माधवराव दळवे यांच्या स्मरणार्थ कोविड केअर सेंटरचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांच्या हस्ते झाले. लक्ष्मणराव पवार विद्यालय रोपळे यांच्या वतीने मागासवर्गीय पांडुरंग रुक्मिणी सभागृह येथे सुरू केलेल्या सेंटरमध्ये एकूण ५० बेड व २ ऑक्सिजन बेड दिले आहेत. सरपंच तात्यासाहेब गोडगे, उपसरपंच तानाजी दास, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शरद पाटील, प्राचार्य योगेश दळवे, श्रीपाद दळवे, डॉ. महेश चव्हाण, डॉ. संजय माळी, अतुल दास, रोपळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उबाळे, ढेरे या परिचारिका नवनाथ गवळी, जगदीश निंबाळकर, अतुल गोडगे, बालाजी गोडगे, कृष्णा दास, अप्पा बनकर यांनी परिश्रम घेतले.
लऊळ येथील लोकसहभागातून सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन झेडपी सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी झेडपी सदस्य भारत शिंदे, माजी उपसभापती प्रतापराव नलवडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड, डॉ. रोहित बोबडे, डॉ. लकी दोशी, डॉ. ज्ञानेश्वर लंगोटे, डॉ. प्रवीण चोपडे, डॉ. मकरध्वज क्षीरसागर, डॉ. सावरे, सरपंच पूजा बोडके, उपसरपंच संजय लोकरे, ओबीसी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण घुगे, बापू लोकरे, कल्याण गाडेकर, आरोग्यसेवक राऊत उपस्थित होते.
---
लऊळमध्ये साडेतीन लाख जमा
लऊळ येथील नागरिकांनी रोख स्वरूपात ३ लाख ४० हजार रुपये जमा केले, तसेच १४ बेड, १० टूल, ७ खुर्ची, मग ५, बकेट ५, मास्क ५००, मग, फॅन ११, ऑक्सिजन मशीन, सॅनिटायझर २५ लिटर, थर्मामीटर, ऑक्सिमीटर व प्रथमोपचार गोळ्या या वस्तू डॉ. चोपडे यांच्याकडून देण्यात आल्या. रवींद्र मांजरे यांच्याकडून ऑक्सिजन रिफिलिंग, तर चहा, नाश्ता व जेवणाची जबाबदारी राजू कोळी व श्रीरंग भोंग यांनी स्वीकारली. गावातील खाजगी डॉक्टर तपासणी करताहेत.
---
आंतरभारतीत ५ ऑक्सिजन सेंटर
कुर्डू येथे लोकसहभागातून सुरू केलेल्या आंतरभारती शाळेतील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच अर्चना जगताप, उपसरपंच अण्णासाहेब ढाणे, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार माढेकर उपस्थित होते. गावातील नागरिकांनी २६ बेड, कॉट, गादी, उशी, १० फॅन, ५ ऑक्सिजन सिलिंडर, १० डस्टबीन आदी साहित्य उपलब्ध करून दिले, तर ग्रामपंचायतही त्या सेंटरला दिवा बत्ती, पिण्याचे पाणी, आंघोळीचे पाणी, साफसफाई करीत आहे. येथील आशा वर्कर व गावातील खाजगी डॉक्टर विशाल अनंतकवळस व सूरज माकुडे परिश्रम घेत आहेत.
....
फोटो :
लऊळ येथे लोकसहभागातील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करताना झेडपी सदस्य रणजितसिंह शिंदे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, माजी उपसभापती प्रतापराव नलवडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, सरपंच पूजा बोडके, उपसरपंच संजय लोकरे.