बार्शी : आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे ऑक्सिजनसाठी पाठपुरावा केला असता लोणंद (ता. फलटण) येथील एमआयडीसीमधील सोना लाॅय कंपनीच्या एम.टी.सी. ग्रुपने बार्शी तालुक्यातील कोरोना केंद्रांना ऑक्सिजन पुरवण्याची तयारी दर्शविली आहे.
लोणंद येथे बंद ऑक्सिजन प्लांट सोना ॲलाॅय कंपनीच्या एम.टी.सी. ग्रुपने चालवायला घेतला आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून बार्शी तालुक्याला ३०० ऑक्सिजन सिलिंडर देण्याची मागणी ई-मेलद्वारे केली. तसेच या मागणीवर त्यांनी फोनवरून चर्चा केली आहे.
बार्शीतील कोरोना हॉस्पिटलला सातत्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. बार्शीतील उद्योगपती फुटरमल मेहता यांचे बंधू मागनलाल मेहता यांचे पुत्र नरेंद्र, संजय व मनोज मेहता या तीन बंधूंच्या एम.टी.सी. ग्रुप सोना ॲलाॅय कंपनीने लोणंद येथील बंद ऑक्सिजन प्लांट चालू करण्यास घेतला आहे. त्या प्लांटवर सध्या उत्पादन सुरू झाले आहे. ५० सिलिंडरची गाडीदेखील आली आहे. त्या ठिकाणी दररोजचे उत्पादन हे २४०० ऑक्सिजन सिलिंडर तयार होत आहेत. यातील बार्शी तालुक्यासाठी २०० ते ३०० ऑक्सिजन सिलिंडर देण्याची मेहता कुटुंबाने तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मोफत देण्याची तयारी ठेवली आहे. आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बार्शीत मेहता यांच्या निवासस्थानी जाऊन फुटरमल मेहता व कमलेश मेहता यांचा सत्कार केला. या वेळी आमदार राजेंद्र राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री दिलीप सोपल, प्रांताधिकारी हेमंत निकम उपस्थित होते.