कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनचा वापर कमी प्रमाणात झाला होता. मात्र दुसऱ्या लाटेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनवरून गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या रूग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे पण ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावत होते.
सांगोला, मंगळवेढा, मोहोळ यासह अन्य गावातील दुसऱ्या लाटेत कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पंढरपुरात उपचारासाठी येत होते. यामुळे शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालयातील सर्व ऑक्सिजन बेड फुल्ल झाले होेते. पंढरपुरात ऑक्सिजन पुरवठा करणारे तीनजण आहेत. मात्र अचानक ऑक्सिजनचा १० पट मागणी वाढली. यामुळे इतर जिल्हे व राज्यातून ऑक्सिजन मागविण्यात येत होते. पंढरपूर तालुक्याला आवश्यकतेनुसार ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रांताधिकारी सचिन ढाेले, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले हे प्रयत्न करत होते.
शहरात दररोज ९०० च्या आसपास ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला जात होता. तर काही रुग्णांचे नातेवाईक इतर गावातूनही ऑक्सिजन सिलेंडर आणून आपल्या नातेवाईकांची प्रकृती ठिक करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र मागील काही दिवसात शहरातील रुग्णालयातील ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी देखील घटली असून सध्या २५ टक्के बेड शिल्लक राहात आहेत.
इतर राज्यातून मिळविला होता ऑक्सिजन
कोरोनामुळे इतर कामाला ऑक्सिजन सिलेंडर पुरवणे बंद केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. परंतु आम्हाला अधिकाऱ्यांकडून हवे ते सहकार्य मिळाले. यामुळे आम्ही मुबलक ऑक्सिजन पुरवठा करु शकलो. यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. परंतु मागील दोन-तीन दिवसात ऑक्सिजनच्या मागणीत घट झाली आहे. त्याचबरोबर मंगळवारी तर सर्व रुग्णालयातील डॉक्टरांनी ऑक्सिजन शिल्लक असल्याचे सांगितल्याचे वितरक सचिन उखंडे यांनी सांगितले.
कोट :::::::::::::::::::::
सध्या पंढरपुरात ऑक्सिजन बेड मागणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परंतु चव न कळणे, वास न येणे, थकवा किंवा बारीक सर्दी अशी कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी. तत्काळ उपचार घेतल्यास रुग्णांची प्रकृती लवकर सुधारते.
- डॉ. सुनील कारंडे, पंढरपूर