लापूर : वीस तासांच्या प्रवासानंतर अंगुल (राज्य - उडिसा) येथून निघालेली राज्यातील ९ वी ऑक्सिजन एक्सप्रेस गुरुवारी सायंकाळी सोलापुरातील बाळे स्थानकावर दाखल झाल्या. रात्री सातनंतर या गाड्या सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, जालना या प्रमुख शहराकडे रवाना झाल्या. तत्पूर्वी ही एक्सप्रेस सोलापुरात आणलेले लोको पायलट अजय सरकार आणि गार्ड अतुल वाघमोडे यांचा रेल्वे प्रवासी संघटनेने सत्कार केला.
महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा राज्याला करण्याचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, देशातील विविध भागातून राज्यातील विविध जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरविण्याचे काम रेल्वेच्या माध्यमातून होत आहे. सोलापूरलाही ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, अशी मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली होती. त्यानुसार ९३.३८ मे. टन लिक्विड ऑक्सिजनने भरलेले सात टँकर रेल्वेने सोलापुरात गुरुवारी सायंकाळी दाखल झाले.
कोणत्या जिल्ह्यांना किती मिळाला ऑक्सिजन
अंगुल (राज्य-उडिसा) येथून भरून आलेले ८ टँकर सोलापुरात दाखल झाले. रात्री सात वाजता टँकर उतरण्यास सुरुवात झाली. रात्री १० ते ११ वाजेपर्यंत टँकर उतरण्याचे काम सुरू होते. यातील २ टँकर सोलापूरसाठी (३१ मे.टन), लातूर १ टँकर (११ मे.टन), उस्मानाबाद १ टँकर (११ मे.टन),औरंगाबाद १ टन (१५ मे.टन), नांदेड १ टँकर (१२ मे.टन), जालना १ टँकर (१२ मे.टन) पाठविण्यात आले.
रेल्वे अधिकाऱ्यांचे नेटके नियोजन
मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापुरात पोहचेपर्यंत व पोहचल्यानंतर सर्व टँकर खाली सुरक्षित उतरून त्या त्या जिल्ह्यांना पोहचेपर्यंत विशेष काळजी घेतली होती. याकामी वरिष्ठ मंडल परिचालन अधिकारी एल. के. रनावले, वरिष्ठ यांत्रिक अधिकारी एस. आर. देशमुख, यातायात निरीक्षक संजीव अर्धापुरे, सहाय्यक परिचलन अधिकारी एस. जे.राघोराव, स्टेशन मास्तर मनोरंजन मोहंती, एच.टी. शर्मा यांनी विशेष काळजी घेत परिश्रम घेतले.
उत्तम कामगिरी
ऑक्सिजन एक्सप्रेस विनाअडथळा अन् वेळेत पोहचविण्याकामी लोकोपायलट (रेल्वेचा चालक) अन् गार्डची भूमिका महत्त्वाची असते. आठ टँकर घेऊन सोलापुरात दाखल झालेली एक्सप्रेसचे लोकोपायलट म्हणून अजय सरकार यांनी पार पडले तर गार्ड म्हणून दौंडचा अतुल वाघमोडे यांनी आपली कामगिरी पार पाडली. याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव यांनी हा सत्कार घडवून आणला.
सोलापूरसाठी मिळालेले दोन टँकरमधील ३१ मे.टन लिक्विड ऑक्सिजनची साठवणूक करण्यात येणार आहे. गरज पडेल तसा त्या ऑक्सिजनचा वापर होणार आहे. सध्या शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होतेय, ग्रामीणमधील संख्या लवकरच कमी होईल. आता कोणत्याही रुग्णालयास ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही.
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर