सोलापूर : एकनाथभाई मुख्यमंत्री होणार हायती.. हे मुंबईत जाईपर्यंत त्यांनाही माहीत नसावं. मलाही माझ्या पीएनं सांगितलं, एकनाथभाई मुख्यमंत्री झाल्यात. तेव्हा म्या तर झोपेतून उठून दणादण उड्याच मारलो अन् पांडुरंगाला.. तुळजाभवानीला.. स्वामी समर्थला पायाला पडलो. महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळाला, अशा भावना सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केल्या.
गुरुवारी मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्याची घोषणा होताच तिकडे गोव्यात सर्व बंडखोर आमदारांनी आनंदोत्सव साजरा करीत मनसोक्त नाचले. यानंतर एका प्रसारमाध्यमाशी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी आठ-दहा दिवसांतील घडामोडी सांगितल्या. सुरुवातीला मी माझ्या भाषेतच बोलतो म्हणत काय सागर बंगला.. काय देवेंद्र.. महाराष्ट्राचं समद ओकेच केलं राव.. हा डायलॉग मारला. ते म्हणाले, ही आमची वैचारिक लढाई आहे. राऊतासारख्या माणसं विनाकारण आम्हाला पिंजऱ्यात उभा केलाय राव.. एकनाथ शिंदेंसारख्या निष्कलंक माणसासोबत आम्ही राहिलाे. सेनेच्या विरोधात नव्हतो राव.. आठ-दहा दिवस बाहेर राहिल्यावर मरतोय काय म्हणत गुवाहाटीतील दिनचर्याच उलगडल्या. टीव्ही पाहणं.. दिवसात दोन बैठका.. खाणं आणि मिळालेल्या वेळेत शंभुराजेंसोबत जुन्या आठवणींवर गप्पा मारणं. एवढंच काम होतं रोजचं.. एकनाथभाई मुख्यमंत्री व्हाव्यात असं मनात वाटतं होतं. मात्र तशी चर्चा कधीच झाली नाही. एकनाथभाईंनाही कदाचित माहीत नसावं, शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालंय काय, देवेंद्र फडणवीस झालंय काय.. दोन्ही माणसं चांगलीच हायती. महाराष्ट्राला इकासाच्या वाटेवर आणतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुवाहाटीत गेल्यावर घराकडंची आठवण येत होती का, असं विचारल्यावर ते म्हणाले, लढायला गेल्यावर घराकडं बघायचं नसतं, असेही ते मिश्किलपणे बाेलले.
...................
शहाजीबापूंच्या पत्नीचं विठ्ठलाकडे साकडे
शहाजीबापूंनी आपल्या पत्नीला फोनवरून बोलत असताना समदं ओके हाय म्हणून सांगितलं. तेव्हा पत्नीकडून त्यांना बळ मिळत असल्याचं त्यांनी बोलून दाखविलं. सर्व व्यवस्थित होण्यासाठी माझी बायको पंढरपूरला जाऊन विठ्ठलाकडे साकडे घातल्याचंही शहाजीबापूंनी सांगितलं. मंत्री होणार का, या प्रश्नावर त्यांनी मी सत्तेचा लोभी नाही.. पुढं काय होईल काहीच माहीत नाही, अशी सावध प्रतिक्रिया दिली.
..................