चपळगाव : कोरोनाचे नियम पाळत स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा उत्सव न्यासाच्या वतीने साजरा करण्यात आला.
न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पादुका पूजन करीत गुरुपौर्णिमेत भक्तिरसाचा रंग भरला. याप्रसंगी डॉ. प्रशांत प्रधान (ठाणे), न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्यामराव मोरे, सदस्य सुरेशचंद्र सूर्यवंशी, वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, मंदिराचे मुख्य पुरोहित मंदार पुजारी, व्यंकटेश पटवारी, रोहित भोरे व मंडळाचे पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी व सोमनाथ कुलकर्णी, विश्वंभर पुजारी उपस्थित होते. अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा उत्सव डामडौल न करता साजरा करण्यात आला.
भिंतीशिल्पाचे उद्घाटन; २०० ट्री गार्ड भेट
अन्नछत्र मंडळाच्या आवारात श्री स्वामी समर्थ जीवनचरित्राच्या भिंतीशिल्पाचे उद्घाटन उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या हस्ते झाले. तसेच श्रीक्षेत्र अक्कलकोट ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील आठ एकर पालखी विसावा-ब्यागेहळ्ळी फाट्यापर्यंत दुतर्फा लावल्या जात असलेल्या झाडांकरिता न्यासाच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शुक्रवारी प्राथमिक स्वरूपात ५० ट्री-गार्ड लावण्याचा शुभारंभ झाला.
-------
फोटो : २६ अन्नछत्र
अन्नछत्र मंडळाच्या वतीने पादुका पूजन करताना अमोलराजे भोसले आणि भक्तगण.