महेश कुलकर्णी
सकाळी झोपेतून उठलो आणि पाहिले तर मुलं आणि आमच्या सौभाग्यवती घरातच दिसल्या. खरे म्हणजे आम्ही ‘सूर्यवंशी’ असल्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्तही कधी पाहिलेला नाही. पण झोपेतून उठल्यावर नेहमीच मुलं शाळेत आणि बायको नोकरीसाठी गेल्याचे पाहायची आम्हा पामराला सवय. पण दोन आॅक्टोबरचा दिवस काही तरी वेगळा असतो, हे आमच्या गावीही नव्हते. उठल्यावर घरात सर्व सदस्यांना पाहिल्यानंतर एकदम डोक्यात ट्यूब पेटली आणि आज सरकारी सुटी असल्याचा साक्षात्कार झाला अन् काही वेळाने आज राष्टÑपित्याची जयंती असल्याचेही लक्षात आले.
(खरं तर अनेकांना सकाळचा चहा नावाचे पेय पीत असतानाच या दिवसाचे महत्त्व कळते). आजच्या दिवशी स्वत: चहा-नाष्टा करावा लागणार नाही, या आनंदात आम्ही आपला दिवस सुरू केला. जगाला शांतीचा संदेश देणाºया या महात्म्याने ‘पराई पीड’ जाणली म्हणून भारतासह जगात आज शांतता नांदते आहे, हे आम्हा पामराला ठाऊक होते. पण पामर तो पामरच. आम्ही आमची समस्या आजच्या पुरती तरी सुटली म्हणून जग जिंकल्याच्या आनंदात होतो. नेहमीच्या सवयीप्रमाणे आज जरा बारकाईने वर्तमानपत्र वाचता येणार म्हणून आम्ही वाचन सुरू केले... सर्वत्र इलेक्शनचा माहोल... मग आम्हीही त्या माहोलमध्ये शिरलो. ‘आबा’, ‘दादा’, ‘मालक’, ‘अण्णा’, ‘बापू’, ‘ताई’, ‘पंत’, ‘नाना’, ‘दीदी’, ‘भाऊ’ हे शब्द वाचायला मिळाले. अमुक ठिकाणचा तिढा सुटला नाही, तमुक ठिकाणी अण्णाचा पत्ता कट करून मालकाला तिकीट मिळालं. ‘दीदी’ला तिकीट मिळाल्यामुळं ‘आबा’ बंडाचे निशाण फडकावणार, सांगोल्याच्या धाकल्या ‘आबा’ला अपक्ष म्हणून उभे राहावे लागणार, अकलूजच्या ‘दादां’ना मनासारखा उमेदवार मिळेना, नेमके काय करावे हे ठरवता न आल्यामुळे ‘मामा’ पुन्हा गोंधळात, पंढरीचे ‘पंत’ म्हणे आता विश्वासघात केल्याचा बदला घेणार, अक्कलकोटच्या ‘अण्णां’ना स्वत:वर तर विश्वास आहे, पण ते ‘ईव्हीएम’ वगैरे काही तरी आहे की तेचं काय?, ‘पंढरीच्या ‘नाना’लाही तीच भीती. ‘मध्य’चा ‘सुवर्ण मध्य’ निघाल्यामुळे इकडे ‘ताई’ आणि तिकडे ‘मास्तर’ भलतेच खुश झाले, पण ऐनवेळी काय होईल हे सांगता येत नाही,असेही आमच्या वाचनात आले. आपल्या विरोधात एकही उमेदवार मिळू नये म्हणून दक्षिणमध्ये ‘बापू’ आणि उत्तरमध्ये ‘मालकाने’ आधीच फिल्डिंग लावल्याचेही आमच्या वाचनातून सुटले नाही.
गेल्या वेळी भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्टÑवादी हे चारही पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे त्यावेळी झालेला सर्व्हे-बिर्व्हे हा काही प्रकार नव्हता. जो लढायला सक्षम आहे, त्याला उमेदवारी हे सूत्र गेल्या निवडणुकीत दिसले. या निवडणुकीत मात्र युती आणि आघाडी झाल्याने ‘सर्व्हे’ हा प्रकार समोर आला आहे. हा सर्व्हे म्हणजे नेमके काय हो? असा प्रश्न आमच्या सौभाग्यवतीने आमचा वाचनभंग करीत विचारला. राजकारणातील सर्व्हे म्हणजे एखाद्या ‘लाभा’साठी निष्ठावंतांचे खच्चीकरण, असा अर्थ असल्याचे आम्ही आमच्या बालबुद्धीला पटेल, असे उत्तर दिले. त्यावर सौभाग्यवतींना हा विषय फारसा न कळल्यामुळे सोडून दिला. पण आम्हाला मात्र या ‘सर्व्हे’मुळे राष्ट्रपिता महात्मा गांधींची आठवण झाली.
ज्या राष्टÑपित्याने ‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाने रे..., या भजनाद्वारे लोकांची पीडा जाणली त्याच महात्म्याच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त होणाºया विधानसभा निवडणुकीत राजकारणात चाललेल्या ‘कोलांट उड्या’ आणि ‘उचलबांगड्या’ म्हणजे समस्त मानव जातीला ‘पीड पराई देणे रे...’ असाच होतो. गांधी जयंतीनिमित्त सुरू असणाºया सप्ताहात एवढे देखील सौजन्य राजकीय पक्षांनी दाखवू नये का, असा सवाल मनात आल्याशिवाय राहत नाही.