मागील दीड वर्षांपासून राज्यभर कोरोना महामारी सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून यात्रा, लग्न, सार्वजनिक मोठ्या कार्यक्रमावर सरकारने बंदी घातली आहे. यामुळेच गेल्या वर्षीच्या आषाढी सोहळ्यासह पंढरपूरमध्ये भरणारे प्रमुख चार यात्रा सोहळे प्रशासनाला रद्द करावे लागले होते. त्यामुळे शेकडो वर्षांची परंपरा खंडित होत पायी जाणारे पालखी सोहळे रद्द करण्यात आले होते. लाडक्या भाविकांना पांडुरंगाचे दर्शनही घेता आले नव्हते. तर पालखी सोहळे रद्द झाल्यामुळे लहान-मोठे व्यावसायिक व इतर व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले होते.
यावर्षी तरी वारी होईल अशी अपेक्षा पालखी सोहळा प्रमुख, महाराज मंडळी, काही व्यापारी, भविकांमधून व्यक्त केली जात होती. मात्र यावर्षीही गतवर्षीपेक्षा भयंकर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे.
आता हा संसर्ग कमी होत आहे. ही समाधानाची बाब असली तरी सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर आणि तालुक्यात वाखरी कोरोनाचा हॉटस्पॉट आहे.
भाविक अन् ग्रामस्थांसाठीही धोक्याचे
वाखरी या गावात सर्वच संतांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम असतो. त्यामुळे येथे मोठी गर्दी होऊ शकते. या गावात जवळपास ८०० कोरोनाबधित रुग्ण सापडले होते. तर ३० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला होता. अजूनही ३० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अधून-मधून नवीन रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये पायी आषाढी यात्रा सोहळा होणे पालखी सोहळ्यातील भाविक आणि ग्रामस्थ या दोघांसाठी धोक्याचे आहे.
म्हणून गतवर्षीप्रमाणे प्रमुख संतांच्या पालख्या बसने आणून आषाढी यात्रा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करून परंपरा जोपासली जावी, आशी मागणी वाखरी ग्रामपंचायतीने प्रशासनासह आळंदी, देहू संस्थानकडे केली आहे. आता प्रशासन व पालखी सोहळा प्रमुख काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोट :::::::::::::::
सण २०२१ आषाढी यात्रा सोहळ्याबाबत आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज व देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानने आम्हाला पायी सोहळ्याबाबत मत मागितले होते. त्यानुसार आता आमच्या गावातील बाधित रुग्ण कमी होत आहेत. असे असले तरी परिस्थिती गंभीर आहे. जास्त वारकऱ्यांसोबत पायी सोहळे काढल्यास ग्रामस्थ, सोहळ्यातील भाविकांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मोजक्या पालख्या, त्यामध्ये किमान ५० भाविकांना परवानगी द्यावी. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून येणाऱ्या पालख्यांना ग्रामपंचायत आवश्यक सर्व सुविधा देईल, असे संस्थानला कळवत आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आता पुढील निर्णय प्रशासन, पालखी सोहळा प्रमुखांनी घ्यावा.
- कविता पोरे
सरपंच, वाखरी (ता. पंढरपूर)