श्री विठ्ठलाच्या दर्शनानिमित्त राज्यभरातून भाविक पंढरपुरात येतात. यामध्ये एस.टी. बसने येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एस.टी. स्टँड ते श्री विठ्ठल मंदिर या मार्गावर नगर परिषदेकडून उभारण्यात आलेल्या दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या शिल्लक आहेत. त्यातील जुने बसस्थानकासमोरील पिण्याच्या पाण्याची टाकी बंद आहे, तर गर्दीचे ठिकाण असलेल्या शिवाजी चौकातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीला चहूबाजूने अतिक्मणाने वेढले आहे. यामुळे भाविकांना सहजरित्या पिण्याचे पाणी मिळत नाही. यामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविक, नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. विठ्ठल भक्तांची गैरसोय होत आहे. नगर परिषदेने पाणपोई सुरू करावी अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
अतिक्रमण पथकाचे दुर्लक्ष
छत्रपती शिवाजी चौकात नगर परिषदेकडून उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीला अतिक्रमणाचा वेढा आहे. या मार्गावरून नगर परिषदेचे अधिकारी जातात. मात्र, त्या ठिकाणी नगर परिषदेकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. त्याचबरोबर नगर परिषदेच्या अतिक्रमण पथकाकडूनही या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.
----
पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळील अतिक्रमण काढून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व पाण्याच्या टाक्या दुरुस्त करून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक, भाविकांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे.
- सुनील वाळूजकर, उपमुख्याधिकारी, पंढरपूर.
फोटो : छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमणाने नगर परिषदेची पिण्याच्या पाण्याची टाकी झाकून गेली आहे.
फोटो : जुन्या बसस्थानकासमोरील बंद अवस्थेत असलेली नगर परिषदेची पिण्याच्या पाण्याची टाकी.