- प्रभू पुजारी पंढरपूर : ‘तुझे दर्शन झाले आता।जातो माघारी पंढरीनाथा।।’अशी सावळ्या विठ्ठलास आळवणी करून आषाढी वारी सोहळ्यानिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो वारकºयांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले़ त्यानंतर मंगळवारी सारा भार परब्रह्म विठ्ठल-रुक्मिणी यांच्यावर सोडून पंढरीचा निरोप घेतला. दुसºयाच दिवशी निम्मी पंढरी रिकामी झाल्याचे दिसून आले़सोमवारी रात्रभर राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन केल्यावर पहाटे चंद्रभागेचे स्नान करून काहींनी पांडुरंगाचे पदस्पर्श, मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेतले तर काहींनी कळसाचे दर्शन घेऊन पंढरीचा निरोप घेण्यास सुरवात केली. त्यामुळे सकाळपासून शहरातून बाहेर जाण्यासाठी शिवाजी चौक ते स्टेशन रोड, सोलापूर मार्गावरील पुलावर, तीन रस्ता, गोपाळपूर रस्ता, करकंब रस्ता, रेल्वे स्टेशन, चंद्रभागा बसस्थानक आदी ठिकाणी वारकºयांची दाटी झाली होती़आषाढीनिमित्त पंढरीत १५ लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल झाले होते, मात्र दुसºयाच दिवशी त्यातील ५० टक्क्याहून अधिक भाविक दर्शन घेऊन गावाकडे परतले. अजूनही दर्शन रांगेत लाखावर भाविक उभे आहेत़रात्रभर गरजली पंढरीआषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात आलेल्या भाविकांनी मठांमध्ये, राहुट्यांमध्ये भजन-कीर्तन भारूडाचा आनंद घेतला. त्यामुळे पंढरपूर शहरात रात्रीही दूरदूरपर्यंत टाळांचा किणकिणाट, पखवाजाची थाप, हरिनामाचा गजर, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषाचा ध्वनी ऐकू येत होता. अनेक हौशी तरुण वारकºयांनी रात्री विविध ठिकाणची गर्दी कमी झाल्यावर वाजत गाजत भजन म्हणत विविध खेळ खेळले आणि वारकरी सांप्रदायाच्या संस्कृतीचा आनंद लुटला.श्री विठ्ठल - रुक्मिणीला वाहिलेले हार सामान्य वारक-यांच्या गळ्यातश्री विठ्ठल-रुक्मिणी श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या चरणावर अर्पण होणारे सर्व हार पदस्पर्श दर्शनासाठी आलेल्या सर्वसामान्य भाविकांच्या गळ्यात घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. यापूर्वी हे हार केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गळ्यातच घातले जात होते. ज्या भाविकांच्या गळ्यात हे हार पडत होते ते प्रसाद म्हणून श्रध्देने घरी नेत असल्याचे दिसत होते.
जातो माघारी पंढरीनाथा! दुसऱ्या दिवशी निम्मी पंढरी रिकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:38 AM