मार्च २१, एप्रिलपासून कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरली होती. याचा पंढरपूर तालुक्याला खूप मोठा फटका बसला आहे. यामध्ये शहरातील राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोना रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला. अचानक प्राणवायूची आवश्यकता व निकड निर्माण झाली आहे. शहरातील खासगी रुग्णालयांनीदेखील नेहमीपेक्षा अधिक त्या कालावधीत चढ्या दऱ्याने प्राणवायूचे सिलिंडर विकत घेतले होते.
कोरोनाची तिसरी लाटसुद्धा चार ते पाच महिन्यांमध्ये येण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता आणखी जास्त असेल असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भविष्यातही प्राणवायूची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्राणवायू निर्मितीबाबत पंढरपूर सक्षम होण्याकरिता त्याचबरोबर प्राणवायूची कमतरता भासू नये, यासाठी प्रति दिन प्राणवायू निर्मिती करण्याचे प्रकल्प उभारण्याचे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मागील महिन्यापासून सुरू आहे. २२ सप्टेंबरच्या आसपास हा प्रकल्प सुरू व्हावा, यासाठी आरोग्य प्रशासन आग्रही असल्याची माहिती डॉ. पी. व्ही. भातलवंडे यांनी दिली.
.........
वार्षिक १७ लाखांची बचत
खासगी एजन्सीकडून उपजिल्हा रुग्णालयाला प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाच्या कालावधीत १ महिन्यामध्ये १५०० आसपास प्राणवायूचे जंबो सिलिंडर लागत होते. परंतु, इतर कालावधीत महिन्याला ३००च्या आसपास प्राणवायूच्या सिलिंडरची आवश्यकता असते. उपजिल्हा रुग्णालयाकडे प्राणवायूचे १२५ जंबो सिलिंडर व छोटे ३२ सिलिंडर आहेत. अंदाजे वर्षाला १७ लाखांच्या आसपास प्राणवायूसाठी खर्च आला आहे. यापुढे तो कमी प्रमाणात होणार असल्याचे डॉ. प्रसन्न भातलवंडे यांनी सांगितले.
.........
२४ तासांत १७५ प्राणवायू सिलिंडर तयार होतील
हवेतून प्राणवायू घेण्याचा प्रकल्पातून २४ तासांत १७५ जंबो सिलिंडर भरून प्राणवायू मिळेल. त्याचबरोबर द्रवरूपी प्राणवायूचा साठा ठेवण्याची सोयदेखील करण्यात येणार आहे. त्याची क्षमता १० केएल असल्याचे डॉ. पी. व्ही. भातलवंडे यांनी सांगितले.
..........
फोटो :
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात होत असलेल्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पाची पाहणी करताना डॉ. पी. व्ही. भातलवंडे.