पंढरपुर : आषाढी एकादशीनिमित्त गुरुवारी (दि.29) पहाटेपासून तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दोन दिवसांत सव्वा लाख भाविकांनी पददर्शन घेतले असून दोन लाखांच्या जवळपास भाविकांनी मुख दर्शनाचा लाभ घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतरही पददर्शन रांग पुढे सरकत नव्हती, त्यामुळे भाविक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत भाविकांनी पोलिसांनाच जाब विचारत मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली.
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते झाली. यावेळी भाऊसाहेब मोहनीराज काळे (५६), मंगलभाऊसाहेब काळे (५२, मु. पो. वाकडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर) या मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या शासकीय महापूजेच्या वेळी दरवर्षी पददर्शन रांग बंद ठेवण्यात येते. मात्र, यावर्षी सुरू ठेवण्यात आली होती. पण, शासकीय महापूजा झाल्यानंतर देखील पद दर्शन रांग पुढे सरकत नसल्याने काही भाविक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. महापूजेदरम्यान पद दर्शन रांग बंद असल्याने पत्राशेड परिसरातील पद दर्शन रांगेत उभा असलेल्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी काही तरुण भाविकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यासंदर्भात काही भाविकांनी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना जाब विचारला. त्यानंतर काही भाविकांनी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली.
भाविकांना दर्शनासाठी विलंब नको म्हणून...भाविकांना दर्शनासाठी विलंब होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही लावाजमा सोबत न नेता अगदी साध्या पद्धतीने विठुरायाचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला होता. शासकीय पूजेच्या वेळी मुखदर्शन चालू ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. केवळ सहा ते सात मंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पडली. त्यानंतर सत्कार कार्यक्रमात देखील मानपान न पाहता मुख्यमंत्र्यांनी थेट स्वतः भाषण करून कार्यक्रम अर्धा वेळेतच संपवला. मात्र, त्यानंतरही मंदिर समितीकडून दर्शनाचा वेग वाढवण्यात आला नाही, असे म्हटले जात आहे.