माळशिरस : आबालवृद्धांना भक्तीचं वेड लावणारा पालखी सोहळा सुरू असून यातील प्रमुख संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ४ जुलै रोजी आणि संत तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. या पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून तयारी झाली आहे. पुरवठा, स्वच्छतासह विविध गोष्टींवर शासनाने भर दिला आहे.
पालखी सोहळ्याचे प्रमुख केंद्र पंढरपूर असल्यामुळे जिल्हा प्रशासनावर मोठा ताण येणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर द्यावा लागणार आहे. पालखी महामार्ग, स्वागत मार्गावर ग्रामपंचायतींकडून तयारी झाली आहे. प्रशासनाने नियोजन बैठकांवर भर दिला आहे.
या संपूर्ण पालखी मार्गावर प्रशासनाने सेवा सुविधा पुरवल्या आहेत. वारी ज्या ठिकाणी मुक्कामी राहणार आहे त्या पालखीतळावर पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक पालखीतळावर पोलीस मदतकेंद्र उभारण्यात आले आहे. कोणत्याही मदतीसाठी हेल्पलाईनचीही मदत मिळणार आहे. पालखीच्या दर्शनासाठी स्त्री आणि पुरुषांची वेगळी रांग राहणार आहे.
वारीच्या निमित्ताने प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला आहे. १ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १० जुलै दरम्यान रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याकडून पंढरपूरकडे फलटण, नातेपुते, माळशिरस आणि वेळापूरमार्गे पंढरपूरकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. ही वाहतूक पुणे, बारामती, इंदापूर, टेंभुर्णी, पंढरपूर किंवा पुणे, यवत, इंदापूर, टेंभुर्णी आणि पंढरपूर अशी राहील. १ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १० जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पंढरपूर आणि सांगोलाकडून वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहील. ही वाहतूक पंढरपूर, टेंभुर्णी आणि पुणे अशी राहील. १ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते ६ जैल रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याहून इंदापूर ते अकलूज मार्गावरील वाहतूक बंद राहील. त्या ऐवजी इंदापूर, टेंभुर्णी आणि अकलूज या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
तसेच १ जुलै रोजी रात्री ११ वाजेपासून ते १० जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंत सोलापूरहून पंढरपूर ते अकलूज हा मार्ग बंद वाहतुकीसाठी राहणार आहे. अकलूजहून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी अकलूज, टेंभुर्णी, सोलापूर या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तसेच सोलापूर-अकलूज प्रवासासाठी सोलापूर, टेंभुर्णी, अकलूज या मार्गांचा वापर करावा लागणार आहे. महाळूंग, श्रीपूर, माळखांबी या दिशेने पालखीमार्गाकडील वाहनांना प्रवेश बंद आहे. या सर्व काळात संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. महिला वारकऱ्यांना वारी सुरक्षित व्हावी म्हणून राज्य महिला आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर ग्रामीण निर्भया पथके निर्माण केली आहेत.
---
माऊलीचे पहिले गोल रिंगण सदाशिवनगरमध्ये
२१ जून रोजी माऊलीच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान झाले आहे. या पालखीचा ४ जुलै रोजी धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होणार आहे. या पालखीचा पहिला मुक्काम नातेपुते येथे असणार आहे. ५ जुलै रोजी मांडवेओढा येथे विसावा असणार आहे. पहिले गोल रिंगण सदाशिवनगर येथे होणार आहे. दुसरा मुक्काम माळशिरस येथे असणार आहे. ६ जुलै रोजी खुडूस येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे. वेळापूर येथे मुक्काम असणार आहे. ७ जुलै रोजी भंडीशेगाव येथे मुक्काम राहणार आहे. ८ जुलै रोजी वाखरीत मुक्काम राहणार आहे. ९ जुलै रोजी पालखी पंढरपुरात पालखी दाखल होणार आहे. १० जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे.
----
तुकाराम महाराज पालखीचे पहिले रिंगण अकलूजमध्ये
संत तुकाराम महाराज पालखीचा ५ जुलै रोजी अकलूज येथे जिल्ह्यात प्रवेश होत आहे. याच दिवसी रिंगण सोहळा व मुक्काम राहणार आहे. ६ जुलै माळीनगर येथे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर बोरगाव येथे मुक्काम राहणार आहे. ७ जुलै राजी पिराची कुरोली येथे मुक्काम राहणार आहे. ८ जुलै वाखरीत मुक्काम राहणार आहे. ९ जुलै रोजी पंढरपुरात दाखल आणि १० जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे.