पंढरपूर (जि. सोलापूर) : माघी यात्रेपूर्वी वारकऱ्यांनी पंढरपुरातील मठामध्ये मुक्काम केला होता. पोलीस प्रशासनाने मठात वारकऱ्यांना मुक्काम करू दिल्यास मठाधिपतींवर गुन्हा दाखल करणार असल्याची नोटीस दिली. पोलिसांनी मठांची तपासणी करताच ३५ ते ४० हजार भाविक आपल्या गावी परतले आहेत. यामुळे माघी यात्रेपूर्वीच पंढरपूर रिकामे हाेताना दिसत आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यातील मठांची तपासणी करण्यासाठी उपविभागीय पाेलीस अधिकारी विक्रम कदम यांनी चार पथके तयार केली. या पथकांनी शनिवारी व रविवारी शहरातील १३७ मठ, तर ग्रामीण भागातील १२० मठ अशी एकूण २५७ मठांची तपासणी केली. शनिवारी मठामध्ये भाविकांची संख्या मोठी होती. रविवारी भाविकांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर मठामध्ये अचानक भेट देण्याचे काम पोलिसांकडून होत आहे. यामुळे मठातील भाविक आपल्या गावाकडे परतण्यावर भर देत आहेत.
४० हजार भाविक एस. टी.ने परतले
शनिवारी दिवसभरात पंढरपुरातून २२ हजार प्रवासी बाहेर गेले, तर रविवारी रात्री ७ वाजेपर्यंत १८ हजार प्रवासी एस. टी.ने आपल्या गावी गेले आहेत. पंढरपुरातून रविवारी पुण्याकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याची माहिती पंढरपूर आगारप्रमुख सुधीर सुतार यांनी दिली.