तलाठी राजेंद्र वाघमारे हे शासकीय वाहन घेऊन लहान मुलास आणण्यासाठी गेले होते. प्रथम त्यांनी शासकीय गोदामाजवळील तीन मुलांना चिठ्ठी काढण्यास येता का, म्हणून विचारले. परंतु ते तीनही घाबरून गाडीमध्ये बसायला तयार नव्हते. त्यानंतर जुना कराड नाका परिसरातील आरोही अभिजित अहिरे (वय ७) ही बालिका येण्यास तयार झाली. तिला शासकीय वाहनातून आणण्यात आले. सर्व ग्रामपंचायतीची मतमोजणी होईपर्यंत ती शासकीय गोदामामध्ये होती. आरोहीने चिठ्ठीद्वारे तीन उमेदवार निवडून दिले.
कौठाळी येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये सुरेखा रघुनाथ गोडसे व इंदुमती सागर गोडसे यांना २५४ अशी समान मते पडली. यामध्ये चिठ्ठीद्वारे सुरेखा गोडसे विजयी झाल्या. पिराची कुरोली येथील ५ नंबर वाॅर्डामध्ये दत्तात्रेय पाटलू कौलगे व कल्याण गोरख सावंत यांना २२७ अशी समान मते पडली. या दोघांमध्ये चिठ्ठीद्वारे कल्याण सावंत विजयी झाले. विटे येथील १ नंबर वाॅर्डामध्ये इंदुमती वगसिद्धबा पुजारी व रुक्मिणी बापू पुजारी यांना १४४ अशी समान मते पडली. या दोघांमध्ये चिठ्ठीद्वारे रुक्मिणी पुजारी विजयी झाल्या.
गत निवडणुकीतही चिठ्ठीद्वारे विजयी
कौठाळी येथील सुरेखा रघुनाथ गोडसे यांना व विरोधी उमेदवाराला मागील निवडणुकीत समान मते पडली होती. त्यावेळीही सुरेखा रघुनाथ गोडसे या चिठ्ठीद्वारे विजयी झाल्या होत्या.
फोटो १८पंड०१
चिठ्ठीद्वारे निकाल जाहीर करण्यासाठी लहान मुलीला मतमोजणीकडे घेऊन जाताना तलाठी राजेंद्र वाघमारे. ( छाया : सचिन कांबळे)