सोलापूर : पैशाच्या कारणावरुन चुलता मोतीलाल बाबुलाल मुंढे (वय ७२, रा. अकोला वा. ता. सांगोला) यांचा खून केल्याप्रकरणी पुतण्या जमीर राजवल्ली मुंढे याला जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा पंढरपूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. मोरे यांनी सुनावली.
२३ डिसेंबर २०१४ रोजी मोतीलाल हे घरात झोपले होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी जमीर हा तिथे आला आणि त्याने पैशाची मागणी केली. मी आता पैसे देणे बंद केले आहे, असे म्हणताच आरोपी जमीर हा संतप्त झाला. त्यानंतर त्याने मोतीलाल यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. मयत मोतीलालची पत्नी शाबिरा हिने सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी जमीरवर भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन तपास अधिकारी सपोनि कुंभार यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यातील बाल नेत्रसाक्षीदार साहिल शरीफ मुंढे, शाबिरा मोतीलाल मुंढे व वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. सरडे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी जमीर मुंढेला जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास १ वर्षे साध्या कैदेची शिक्षाही सुनावली. मयताच्या वारसाला २० हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. यात सरकारतर्फे अॅड. आनंद गोरे तर आरोपीतर्फे अॅड. सुधीर वाघ यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून हवालदार रवींद्र बनकर यांचे सहकार्य लाभले.