रुपेश हेळवे
सोलापूर : प्रवाशांची गर्दी अन् रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता मध्य रेल्वे प्रशासनाने पंढरपूर-दादर एक्सप्रेसला आता भिगवन स्थानकावर थांबा दिला आहे. याबाबतचा निर्णय नुकताच रेल्वे प्रशासनाने जाहिर केला आहे. या निर्णयामुळे विठ्ठल भक्तांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने मसूर, सातारा, कर्जत लोणावळा, रोहा भिगवण आणि संगमेश्वर रोड स्थानकावर गाड्यांना प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दोनच दिवसापूर्वी होटगी स्थानकावर हुबळी-हैदराबाद एक्सप्रेसला थांबा दिला आहे. यामुळे सोलापूरहून कर्नाटकात अन् कर्नाटकातून सोलापुरात येणार्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. याशिवाय पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्या भिगवणमधील भाविकांची मोठी सोय या पंढरपूर-दादर एक्सप्रेसमूळे होणार आहे. दादर-पंढरपूर एक्सप्रेस भिगवन स्थानकावर ५.२८ वाजता पोहोचेल आणि ५.३० वाजता निघेल तर पंढरपूर-दादर एक्सप्रेस ही निर्धारित वेळेत धावणार आहे. तरी प्रवाशांनी या थांब्याची माहिती घेऊन प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.