पंढरपूर: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे हे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३,७३३ मतांनी पराभव करून विजयी झाले. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिवंगत भारत भालके यांच्या आकस्मिक निधनामुळे पंढरपूर- मंगळवेढ्याची पोटनिवडणूक लागली होती. राष्ट्रवादीकडून त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. भाजपाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली होती.
पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. भाजपा-सेनेची युती असल्यापासून या ठिकाणी त्यांचा उमेदवार कधीही निवडून आलेला नाही. पण यावेळी कमळ फुलले आहे. आवताडेंना १ लाख ९ हजार ४५० मते मिळाली, तर भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मते मिळाली. आवताडेंचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे हे २,९५५ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे या १,६०७ मते घेत चौथ्या क्रमांकावर राहिल्या. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांनी बंडखोरी केली होती. त्यांनाही अवघ्या १,०२७ मतांवर समाधान मानावे लागले आहे.
पंढरपूर- मंगळवेढ्याच्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्याने पक्षासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीत निवडणुकीअगोदर पदाधिकारी निवडीवरून सुरू असलेला गोंधळ, विठ्ठल कारखान्याची मागील काही वर्षांपासून असलेली बिकट आर्थिक अवस्था, भगीरथ भालके यांचा कमी असलेला जनसंपर्क, मागील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचे कट करण्यात आलेले वीज कनेक्शन, कर्जमाफी, अनुदान, विठ्ठल बळकावण्याचा भाजपकडून केलेला प्रचार यानंतर अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर मंत्री, खासदार, आमदारांनी प्रचार करूनही ही जागा महाविकास आघाडीला राखण्यात अपयश आले, असं सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीने पंढरपूर- मंगळवेढ्याची जागा गमावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपावर आरोप करत एक भावनिक ट्विट केलं आहे. ''भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले'', असं अमोट मिटकरी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
दरम्यान, पंढरपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून भाजपाचे समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. सुरूवातीच्या काही कलानंतर आवताडे पिछाडीवर जातील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना होता. परंतु शेवटपर्यंत आवताडे यांनी आघाडी वाढतच गेली. अखेर ३८ व्या फेरीनंतर समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला गेला. समाधान आवताडे हे सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे ५ वे आमदार म्हणून निवडून आले आहेत.
आवताडे आणि परिचारक यांच्या एकीचा विजय
मंगळवेढा-पंढरपूरमध्ये भाजपाचा स्पष्ट विजय झाला आहे. वीज कनेक्शन कापणे, कोविड काळात अनेकांना पॅकेज नाही. पीकविमा नाही, त्यामुळे लोक निवडणुकीची वाट पाहत होते. राज्यातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारविरोधात राग आहे. याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागेल असं त्यांनी सांगितलं त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव न घेता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला. पंढरपूरात करेक्ट कार्यक्रम झाला. दुसऱ्याचे शब्द वापरणं मला आवडत नाही. पंढरपूरमध्ये कार्यकर्ते नीट कामाला लागले तर काय होऊ शकतं हे दिसून आलं. तसेच प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांची घट्ट एकी झाल्याने हा निकाल लागला असल्याचं श्रेय चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्ते आणि परिचारक आवताडे यांच्या एकीला दिलं.
जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे- समाधान आवताडे
या निवडणुकीत आम्हाला विजय अपेक्षित होता. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर केल्यामुळे अपेक्षित मताधिक्य आम्हाला मिळाले नसले तरी जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. या निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. याअगोदर पंढरपूर-मंगळवेढ्याला एक आमदार होता. मात्र आता आमदार प्रशांत परिचारकांसोबत मी स्वत: आमदार झालो आहे. त्यामुळे आम्ही दोघं मिळून पंढरपूर-मंगळवेढ्याचा सर्वांगीण विकास करू. मंगळवेढ्याच्या ३५ गावांच्या पाण्यासाठी केंद्रातून निधी आणण्यासाठी प्रयत्न करत असताना इतर समस्याही सोडविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे.