सोलापूर - राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालातील पहिल्या फेरीत पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालकेंनी आघाडी घेतली होती. मात्र, सातव्या फेरीनंतर भाजपाच्या समाधान आवताडेंनी भगिरथ भालकेंना मागे टाकले आहे. तर, स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला पंढरपूर-मंगळवेढाकरांनी सपशेल नाकारले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपाकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, या दोन उमेदवारांमध्ये चुरस सुरू आहे. विशेष म्हणजे स्वाभीमानी पक्षाचे नेते सचिन शिंदे यांना 17 व्या फेरीअखेर केवळ 320 मतं मिळाली आहेत. तर, शैला गोडसे यांना 663 मते मिळाली आहेत. तर, अभिजीत बिचुकले यांनी तीन आकडी मतांचा टप्पाही पूर्ण केला नाही.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी तळ ठोकला होता. या मतदारसंघात फिरुन त्यांनी लोकांकडे मतं आणि निवडमुकीसाठी निधीही मागितला होता. मात्र, राजू शेट्टींच्या उमेदवाराला पंढरपूरकरांनी सपशेलपणे नाकारले आहे. सचिन शिंदे यांना 17 व्या फेरीअखेर केवळ 320 मतं मिळाली आहेत. त्यामुळे, जवळपास त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. मात्र, आपलं डिपॉझिट वाचेल, एवढेही मतं त्यांना घेता आली नाहीत.
पंढरपूर शहर आणि तालुक्याचे मतमोजणी संपली असून मंगळवेढा तालुक्यात सुरुवात झाली आहे. त्यामध्ये अनवली, रांजणी, शिरगाव, तरडगाव, अहमदाबाद गुंजेगाव, मारापुर यातील मते आहेत. समाधान आवताडे यांनाा यापूर्वीच्या फेऱ्यांमध्ये साधारण 300 ते 700 मतांचे मताधिक्य होते, ते मंगळवेढ्याची सुरुवात झाल्यानंतर थेट 1 हजार मताधिक्याने सुरुवात झाली आहे. 23 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 5,807 मतांनी आघाडीवर आहेत.