सोलापूर - राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक चुरशीची होत आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपाच्या समाधान आवताडेंमध्येच चुरस पाहायला मिळाली. एकूण 19 उमेदवार रिंगणात आहेत, पण इतर उमेदवारांना 19 व्या फेरीअखेर 1 हजार मतांचाही टप्पा पार करता आला नाही.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकले यांना केवळ 54 मतं मिळाली आहेत. तर, समाधान आवताडेंचा विजय निश्चित मानला जात आहे. 29 व्या फेरी अखेर समाधान आवताडे यांची 6331 मतांची आघाडी मिळाली आहे. पंढरुपुरातील निकालाबद्दल बोलताना, समाधान आवताडेंचा विजय निश्चित असल्याचं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय.
पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातून राष्ट्रवादीच्या उमदेवाराला 10-10 हजारांचं मताधिक्य मिळेल, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसला होता. पण, यंदा प्रशांत परिचारक यांनी पंढरपूरात चांगली मोट बांधली आहे. येथील मतदारसंघातून दोनवेळा परिचारक यांना पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे, जवळ राहून अंतर्गत विरोध करणाऱ्यांना यंदा प्रशांत परिचारक यांनी बाजूला सारले. तसेच, या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना जवळ घेऊन मतदारसंघात भाजपाचा प्रचार केला. त्यामुळे, राष्ट्रवादीला अपेक्षित मतं येथून मिळाली नाहीत. अठराव्या फेरीअखेरची आकडेवाडी सांगताना, आता मंगळवेढा शहर आणि ग्रामीणची मतमोजणी होणार आहे. सध्या समाधान आवताडे आघाडीवर आहेत, तर आता मंगळवेढा हा त्यांचाच मतदारसंघ आहे, ते तेथील भूमिपुत्र आहेत. त्यामुळे, मंगळवेढ्यात आघाडी घेऊन ते निश्चितच विजयी होतील, असे पडळकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एकूण 36 फेऱ्या होणार आहेत. त्यापैकी, 29 व्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना 6631 मतांची आघाडी आहे. 19 व्या फेरीअंती आलेल्या आकडेवाडीनुसार भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना 895 मतांची आघाडी होती. त्यानंतर, पंढरपूर शहर व ग्रामीणचं मतदान संपलं असून मंगळवेढ्यातील गावाच्या मतदानाला सुरुवात झाली. त्यामुळे, मंगळवेढ्यातून त्यांनी मोठ्या आघाडीनं मतदान घ्यायला सुरुवात केल्याचं आकड्यांवरुन दिसून येत आहे.