सोलापूर : पंढरपूर राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज ४० ते ५० हजार तर यात्रा कालावधीत लाखो भाविक येतात. भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने पंढरपुरात नवीन चंद्रभागा बसस्थानक उभा केले आहे. येथे एसटी बस थांबण्यासाठी ३४ प्लॅटफार्म व भाविकांना निवास करण्यासाठी ५० खोल्या बांधण्यात आल्या आहेत. यामुळे भाविकांची सोय होणार आहे.
यापूर्वीचे बसस्थानक अपुरे पडू लागल्याने तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चंद्रभागा मैदान येथे नवीन बसस्थानक बांधण्याचा निर्णय घेतला. सुमारे २३ कोटी रुपये खर्च करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. २० कोटी रुपये खर्च करून ३४ प्लॅटफार्म व भाविकांना निवास करण्यासाठी ५० खोल्या बांधण्यात आल्या आहेत. बसस्थानकात उतरल्यानंतर भाविकांना निवासासाठी लॉज, मठ, मंदिर, धर्मशाळा शोधण्याची गरज भासणार नाही. आषाढी यात्रेत चंद्रभागा बसस्थानक भाविकांच्या सेवेत रूजू होणार आहे.