पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा कॉंग्रेस पक्षाचीच : नितीन नागणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:52 PM2021-03-25T16:52:34+5:302021-03-25T16:52:37+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
पंढरपूर - पंढरपूर - मंगळवेढा ही विधानसभेची जागा पुर्वीपासून कॉंग्रेस पक्षाकडे असल्याने पुन्हा या जागेची मागणी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली असून पक्षाने आदेश दिल्यास या पोटनिवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिली आहे.
2009 साली स्व.आमदार भारत भालके यांनी रिडालोस या आघाडीतून विजयी झालेल्या पहिल्या दिवशी कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भालके यांना मुंबईला येण्यासाठी खास विमान पाठवून दिले होते. त्या दिवशी ते मुंबई येथे आल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतलेले होते. 2009 ते 2019 या 10 वर्षांच्या काळात ही पंढरपूर - मंगळवेढा ही विधानसभेची जागा कॉंग्रेस पक्षाकडे होती. त्यावेळी स्व.भालके व राष्ट्रवादी पक्षाने कॉंग्रेसला न विचारता 2019 साली राष्ट्रवादीने भालकेंना उमेदवारी दिली.
नागणे म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. या दृष्टीकोनातून सध्या कॉंग्रेसची वाटचाल सुरू आहे. सध्या पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघात कॉंग्रेसला मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. त्यामुळे सदरची जागा पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षाला सोडण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे साहेब, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्षा प्रणितीताई शिंदे, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीतदादा तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
कॉंग्रेस पक्षाने आदेश दिल्यास उमेदवारी अर्ज भरणार - नितीन नागणे
सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक सुरू झालेली आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या विचारांचा मोठा मतदार आजही आहे. त्यामुळे या जागेची आपण कॉंग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने आदेश दिल्यास आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी दिलेली आहे.