राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. पश्चिम बंगालसह इतर पाच राज्यांच्या निवडणूक तारखा जाहीर करताना या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर होईल, असा अंदाज असताना तारखा जाहीर होण्यास विलंब होत होता. त्यामुळे या निवडणुकीबाबत उत्सुकता होती. ती उत्सुकता अखेर संपली असून मंगळवारी (ता. १६) अखेर निवडणूक आयोगाकडून तशी घोषणा करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी अनेकजणांनी तयारी केली आहे. २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. ३० मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख तर ३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. प्रत्यक्ष मतदान १७ एप्रिल तर मतमोजणी २ मे रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यामुळे आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. ही बहुचर्चित पोटनिवडणूक जाहीर झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात वातावरण तापणार आहे. यासाठी राजकीय पक्षासह प्रशासन कामाला लागले आहे.