मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या मागणी संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लवकरच सेवा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले की, मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यांतील कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटरबरोबर ऑक्सिजन कमी पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. आमदार आवताडे यांनी केलेल्या सूचनेनुसार दोन्ही तालुक्यांत कोरोना तपासणीचे (टेस्टिंगचे) प्रमाण वाढवण्याच्या सूचना तेथील स्थानिक पातळीवर दिल्या जातील, असे सांगितले. दरम्यान, मंगळवारी आमदार समाधान आवताडे यांनी टेंभुर्णी येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास भेट दिली होती. या प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या ऑक्सिजन निर्मितीची व निर्मिती दरम्यान येणाऱ्या विविध अडचणी यावरही यावेळी चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी टेंभुर्णी येथील प्लांटला कोटा वाढवून दिला असल्याचे सांगितले.